Home स्टोरी सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये.,.!

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये.,.!

149

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील अमेरिकेची बलाढय़ कंपनी ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता; परंतु हा प्रकल्प गुजरातला पळवल्याचे शुक्रवारी वृत्त होते. त्यापाठोपाठ आता पाणबुडी पर्यटन प्रकल्पही पळविला आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.

गुजरात सरकारचा माझगाव डॉकबरोबर करार

गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार ३५ टन वजनाची आणि २४ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये २४ प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील ३०० फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.

२०२४ च्या दिवाळीपर्यंत पाणबुडी पर्यटन सुरू होईल

 

पाणबुडी २०२४ च्या दिवाळीपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पारधी यांनी सांगितले. द्वारका हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी २०१८  अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.

 

१५० कोटींची उलाढाल, रोजगार हिसकावला

केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच १०० ते १५० कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.