Home स्टोरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य साठवण केंद्रांसाठी २८ कोटी मंजूर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य साठवण केंद्रांसाठी २८ कोटी मंजूर…

159

 

सिंधुदुर्ग:-

 

देशाच्या राष्ट्रीय सीमावर्ती क्षेत्राचा अत्यंत महत्वाचा भाग असणाऱ्या कोकणातील मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छिमारी बंदरांच्या परिपूर्ण विकासाकरिता केंद्र सरकारने तब्बल ३५३९.८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. परिणामी आता कोकण किनारपट्टीतील मच्छिमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात गतीमान होण्या बरोबरच या सर्व बंदरांवर येत्या काळात वर्दळ वाढून जाग निर्माण होणार असलेल्याने राष्ट्रीय सागरी सुरक्षेला देखील नवा आयाम प्राप्त होणार आहे.

 

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १८ बंदरांची या विकास योजनेत निवड केली असून यामध्ये नऊ मासेमारी बंदर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यापैकी चार प्रकल्पांना बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाशी अभिसरण पद्धतीने आणि पाच प्रकल्पांना मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेती पायाभूत सुविधा निधी (एफआयडीएफ) अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने मंजूरी दिली आहे. शासनाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने (पीएमएमएसवाय) अंतर्गत महाराष्ट्रातील नऊ मत्स्य साठवण केंद्रे बांधण्यास मान्यता दिली याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली आहे.

 

महाराष्ट्रातील नऊ मासेमारी बंदर विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील मॅलेट बंदराकरिता ९६.६० कोटी, ससुन डॉक बंदराकरिता ९२.५२ कोटी, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यांतील जीवना मच्छिमारी बंदराकरिता १८५.४८ कोटी, श्रीवर्धन मधीलच भरडखोल मच्छिमारी बंदराकरिता ११९ कोटी, उरण तालुक्यांतील कंरजा बंदराकरिता १४९.८० कोटी निधी देण्यात आला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी मच्छिमारी बंदरासाठी ८८.४४ कोटी, रत्नागिरी जिल्ह्यातील हेर्णे दापोली मच्छिमारी बंदराकरिता २२१.३४ कोटी व साखरी नाते राजापूर मच्छिमारी बंदराकरिता १४६.९० कोटी तर पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमारी बंदराकरिता २६७.१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा एकुण निधी १३९७.२० कोटी रुपये आहे.

 

मत्स्य साठवण केंद्र विकास…

 

महाराष्ट्रातील मत्स्य साठवण केंद्रे प्रकल्पांतर्गत एकूण नऊ मत्स्य उतरवणी केंद्रांकरिता एकूण ११४२.६० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून रायगड जिल्ह्यातील कोर्लई बंदराकरिता ७.६५ कोटी, रेवदंडा, अलिबागबंदराकरिता ४५. ९६ कोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा मत्स्य उतरवणी केंद्राकरिता १५.२४ कोटी, दांडी-माक्रेवाग, मालवण केंद्राकरिता ४.५२ कोटी, तारामुंबरी, देवगडकरिता ७.७६ कोटी, दाभोळ, रत्नागिरीकरिता ९. ३९ कोटी, पालशेत, गुहागर – रत्नागिरीकरिता ८.३४ कोटी, असगोली, गुहागर, रत्नागिरीकरिता ८.८३ कोटी, भुदल, गुहाघर, रत्नागिरीकरिता ६.५७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.