Home स्टोरी सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ व्याख्यान व्याख्याते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे. 

सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ व्याख्यान व्याख्याते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे. 

82

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आयोजन.

सावंतवाडी प्रतिनिधी:

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.

आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. या प्रवासात महाराजांनी या गडावर अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. महाराजांचा जीवन प्रवास आसमंत दीपवून टाकणाऱ्या तेजाने शौर्याने दूरदर्शी लोकहितवादी मुत्सद्दी दृष्टिकोनांनी भारलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कामगिरीत आणि स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत चमत्कार वाटावा असे कितीतरी पैलू नजरेस पडतात. स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील प्रतापगड, तोरणा, राजगड, रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, विशाळगड, सिंधुदुर्ग यासह कित्येक गड व किल्ले यांचा समावेश आहे. गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेतील तामिळनाडूतील ‘जिंजी पावेतो’ वरील महाराजांचा दक्षिण दिग्वीजयाचा अजरामर पराक्रम समजून घ्यावा तितका थोडाच वाटत जातो.

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत महाराजांनी १६७७-७८ च्या दरम्यान तंजावर पावेतो जिंकलेला मुलुख ही महत्त्वाची घटना होती. महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय किती दूरदर्शी होता याची साक्ष छत्रपतींच्या पश्चात मराठा साम्राज्याला आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हाच जिंजी किल्ला छत्रपती राजाराम महाराजांना आश्रयाला उपयोगी पडला. त्यांनी या किल्ल्यावरून मराठ्यांची राजधानी तब्बल ८ वर्षे चालवली. छत्रपतींचा इतिहास समजून घेताना हा दक्षिण दिग्विजय फारसा प्रकाशात आला नसल्याचे दिसते. पण हा इतिहास महाराजांच्या पराक्रमांचे रोमांचकारी पैलू सांगणारा आहे. या मोहिमेचे यथार्थ वर्णन महाराजांच्या दक्षिणेतील पराक्रमाच्या तेजस्वी पाऊलखुणा, यातील बारकाव्यासह त्यांच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. ती ऐकण्यासाठी अवघ्या रयतेने यावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

 

डॉ. शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. यात हजारो शिवभक्त सहभागी होतात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.