Home स्टोरी ‘सामाजिक बांधिलकी’ करणार सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे तोडण्यासाठी नगरपरिषदेला मदत

‘सामाजिक बांधिलकी’ करणार सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे तोडण्यासाठी नगरपरिषदेला मदत

155

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते नेहमीच कोणत्याही बिकट परिस्थितीत सावंतवाडी शहरात आणि जवळपासच्या गावा गावात तात्काळ सेवा पुरवण्यासाठी तत्पर असतात.  रस्त्यावरील अपघात, शहरातील गरजूना मदत, रक्तदान शिबिराचे आयोजन, तात्काळ गरजू व्यक्तीला रक्तपुरवठा, वृद्ध नागरिकांची सेवा व मदत, शहरात स्वच्छता ठेवणे आणि आसपास असणाऱ्या धोकादायक तसेच अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्ते, गटार, झाडे याबाबत प्रशासनाला योग्य ती माहिती देऊन प्रशासनाला ते काम पूर्ण करण्यासाठी योग्य ती मदत करणं यासाठी सध्या सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरात राजवाड्या जवळ माडाचे झाड पडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन ते  झाड तोडून त्या दोन मृत तरुणांना बाहेर काढले. या अपघाताचा विचार करून असे अपघात पुन्हा होऊ नयेत म्हणून सावंतवाडी शहरातील नगरपरिषद हद्दीतील व खाजगी जागेतील धोकादायक झाडे व काही धोकादायक घटक यांचे सर्वेक्षण करून त्यावर पालिकेने कारवाई करण्याकरिता सामाजिक बांधिलकी नगरपरिषदेला योग्य ती साथ देणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आज सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडांची त्वरित सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती केली. सदर निवेदने सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी महसूल देण्यात आली.

सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सावंतवाडी शहरातील खाजगी व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर व घरांवर झुकलेली धोकादायक झाडे तोडून घेण्यासाठी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी साथ देणार आहे. त्यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की आपली साथ लाभली तर आणखी काम सोपं होईल आपली साथ आम्ही नक्कीच घेऊ कारण शहरात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये धोकादायक झाडांचे सर्वेक्षण होईल त्यानंतर धोकादायक झाडे तोडले जातील. नैसर्गिक आपत्तीमुळे त्या दुर्घटना घडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी तळमळीने काम करत आहे. अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या मदतीला धावणार आहे अशी ग्वाही सामाजिक बांधिलकीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सतीश बागवे, संजय पेडणेकर, सावंतवाडी शहरातील अशोक पेडणेकर, समीरा खलील, हेलन निबरे, शेखर सुभेदार व रवी जाधव उपस्थित होते.