शिर्डी: कोरोना काळात साई मंदिरातील हार, फुले आणि नैवेद्य यावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे दुकानदारांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. शेतात फुले सडत होती तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा देखी वाढत होता. शिर्डी भागात सुमारे ५०० शेतकरी फुलांची लागवड करतात. शिर्डीत दररोज लाखो रुपयांचा फुलांचा व्यवसाय होतो.
शिर्डीच्या साई मंदिरात फुले व नैवेद्य नेण्यास बंदी घातल्याने तणाव वाढला होता. साईभक्त देखील नाराज होते. भाविक आणि दुकानदार सतत ही बंदी उठवण्याची मागणी करत होते. शिर्डीतील काही ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी बळजबरीने साईबाबा मंदिरात हार व फुले नेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संस्थेचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती.
कोरोना काळात घातलेली बंदी आता साई संस्थान उठवणार आहे. कोरोना काळात साईबाबाना फुल, हार, प्रसाद वाहण्यास संस्थानने बंदी घातली होती. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.