Home स्टोरी सांकवाळ येथील खाडीत मासेमारी करणार्‍या युवकाला सापडली देवीची मूर्ती….

सांकवाळ येथील खाडीत मासेमारी करणार्‍या युवकाला सापडली देवीची मूर्ती….

124

गोवा: मे (वार्ता.): – सांकवाळ येथे खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका युवकाला खाडीतील पाण्यामध्ये खडकाळ जागेत देवीची मूर्ती सापडली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार पुरातन विजयादुर्गा मंदिराच्या जागेच्या परिसरात असलेल्या खाडीमध्ये आयुष नाईक हा युवक मासेमारी करण्यासाठी गेला असता त्याला सूर्यप्रकाशामध्ये खाडीतील पाण्यामध्ये चमकणारी देवीची मूर्ती दिसली.ती मूर्ती त्याने बाहेर काढून त्या भागातील लोकांना दाखवली. त्या गावात श्री विजयदुर्गादेवीचे अस्तित्व आहे, अशी गावकर्‍यांची श्रद्धा असल्याचे त्यांनी आयुष याला सांगितले. त्याने ती मूर्ती ग्रामस्थांकडे सोपवली.

या गावातील पंचसदस्य तुळशीदास नाईक म्हणाले, ‘‘या भागाला सांकवाळचे प्रवेशद्वार म्हटले जाते. प्राचीन काळी या ठिकाणी श्री विजयादुर्गेचे मंदिर होते, असा इतिहास आहे. पोर्तुगिजांनी या मंदिराचा भंग केला. त्यानंतर देवीचे स्थलांतर करून फोंडा तालुक्यातील केरी येथे तिची स्थापना करण्यात आली. योगायोगाने या प्रभागाचा मी पंचसदस्य आहे. ‘देवीचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. या भागाला शंखवाळ म्हणतात कारण येथे शंख सापडतात.आज देवी इथे साक्षात प्रगट झाली आहे. ‘या ठिकाणी विजयादुर्गेच्या मंदिराची स्थापना व्हावी’, अशी आमची इच्छा आहे.’’ही मूर्ती इतिहासाचे प्राध्यापक डॉ. रोहित फळगावकर यांना दाखवली असता ते म्हणाले, ‘‘ही मूर्ती वाघावर आरूढ झालेल्या देवीची मूर्ती आहे. प्रथमदर्शनी पहाता ही मूर्ती प्राचीन किंवा मध्ययुगीन वाटत नाही. ही मूर्ती प्रत्यक्ष जर पहाता आली, तर या मूर्तीविषयी आणखी सांगता येईल.’’