Home स्टोरी समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संशोधनात चिंता वाढवणारा निष्कर्ष!

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संशोधनात चिंता वाढवणारा निष्कर्ष!

90

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासासाठी लागणारा वेळ अल्प झाला आहे; मात्र सतत होणार्‍या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील ‘व्ही.एन्.आय.टी’ संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ‘ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग’च्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघातांचे कारण शोधण्यासाठी ३ मास संशोधन केले. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या मार्गावरून प्रवास करतांना संमोहनामुळे अपघात, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आणि अती वेगामुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ उत्तरदायी असल्याचा दावा करण्यात आला आहे. जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. कोणत्याच अडथळ्यांविना त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गी एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरिराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूही क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसमवेत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहना’चे बळी ठरले असून अपघाताच्या काही सेकंद आधी मेंदू आणि शरीर यांनी जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी, ती वेळेत न केल्याने अपघात झाले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. ‘महामार्ग संमोहन’ हे अपघाताला ३३ टक्के कारणीभूत ठरत आहे, असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.नियमांचे पालन न करणे !
लेन कटिंग’ हे समृद्धी महामार्गावर अपघाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर ३ पदरी २ स्वतंत्र ट्रॅक आहेत. समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न नाही; मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे ‘साईड डॅश’मुळे झाले आहेत. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसर्‍या लेनवर जातांना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे मागून येणार्‍या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित हालचाल असते. त्यातच महामार्ग संमोहनाची क्रिया काम करत असल्याने चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचीही संधी मिळत नाही. त्यामुळे ‘साईड डॅश’ होऊन भीषण अपघात होत आहेत, असे या संशोधनात पुढे आले आहे. आजवर झालेल्या अपघातात ४० टक्के अपघात ‘साईड डॅश’मुळे झाले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्ग

अतीवेगामुळे अपघात! समृद्धी महामार्गावर ३० टक्के छोटी वाहने आणि २० छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. त्यातच ५१ टक्के ट्रकचालक हे लेनची शिस्त पाळत नसल्याचेही समजते. चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. त्यामुळे चालकांकडून लेनची शिस्त न पाळली गेल्याने अपघात होत आहेत. याला ‘असिव्ह ड्राईव्ह’ म्हणतात. हे अपघाताला ११ टक्के कारणीभूत ठरले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंटच्या रस्त्यावर टायर फुटणे हे अपघाताला ३४ टक्के कारणीभूत ठरले आहे. समवेत काही कारणाने चालकाचे लक्ष विचलित झाल्याने २४ टक्के अपघात झाले, तर भ्रमणभाषचा वापर ८ टक्के अपघाताला कारणीभूत ठरला आहे. या सर्वांमध्ये अतीवेग हा समान धागा असल्याचे संशोधनात दिसून आले.