नाशिक पदवीधर मतदार संघ राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि महत्वाचा मुद्दा ठरला. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले. त्यानंरत नाशिक पदवीधर मतदार संघाचे विजयी आमदार सत्यजित तांबे यांच्या शपथविधीच्या वेळी आज आश्चर्यकारक घटना घडली. विधान परिषदेत सत्यजित तांबे यांचा शपथविधी सुरु होता. त्याच वेळी सभागृहातून एकच वादा… अजित दादा अशी घोषणाबाजी सुरु झाली. सत्यजित तांबे आणि भाजपची जवळीक वाढल्याची एकिकडे चर्चा असतानाच तांबे यांच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोर लावल्याचं म्हटलं गेलं. त्यातच आता सत्यजित यांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या नावाच्या घोषणाबाजीमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
विधान परिषदेत आज सत्यजित तांबे हे शपथविधीसाठी पुढे आले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच वादा सत्यजित दादा. अशी घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील इतर कार्यकर्त्यांनी एकच वादा… अजित दादा अशी घोषणाबाजी केली. या दोन्ही घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.
नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसने तिकिट दिलेले त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय़ घेतला.
सत्यजित तांबे यांनी काँग्रेस विरोधात उचललेल्या पावलामागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरुवातीला यामागे भाजप, देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं जात होतं.
सत्यजित तांबे आता भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपने त्यांना तशी ऑफर दिली नाही किंवा सत्यजित तांबेही भाजपकडे मदतीसाठी गेले नाहीत. निवडणूक निकालात विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सत्यजित तांबे यांचे मामा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाना पटोलेंविरोधात भूमिका घेतली. नाशिकच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठं राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.
तर अजित पवार यांनीही मोठं वक्तव्य केलं. सत्यजित तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यायला हवी होती. पण तसं घडलं नाही. अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर आता तांबे यांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या नावाची घोषणाबाजी झाली. यावरून आता ही राष्ट्रवादीची खेळी होती का? असा प्रश्न उपस्थित झाला असून राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आलं आहे.