कुडाळ: शहरात श्वेता आखाडे या महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस आता या महिलेसह अन्य दोघांचेही कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासणार आहेत. यावरून काही वेगळी माहिती मिळते का ? याचा तपास करण्यात येईल. सद्यस्थितीत ही आत्महत्या असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तरीही या विषयाला कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरून काहीसे स्पष्ट होत आहे. मात्र, याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याने काही चर्चेत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत.
कुडाळमधील एका नामांकित हॉटेलमध्ये मुंबईस्थित श्वेता आखाडे या महिलेचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. या महिलेचा पतीशी फोनवरून वाद झाला होता. यातूनच या महिलेने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. परंतु, असे असले तरी या घटनेनंतर चर्चेत असणारे काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. यानंतर आता पोलीस या विषयाच्या अनुषंगाने सखोल तपास करताना श्वेतासह चर्चेत असलेल्या अन्य दोघांचेही कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत याबाबत कोणाचीही तक्रार दाखल नसल्याने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्नांच्या मुळाशी जाणे कठीण बनत आहे.
 
             
	






