मसुरे प्रतिनिधी: राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड व्हिक्टिमसहिंत विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाऊंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. सदर कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण देवालय येथे झाला. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पांरपारीक लोककलेला एक वेगळी ओळख देत त्या कलांच संवर्धन करणारी लोककला बोलीभाषा जपणारी अर्चना आणि तिची माय, आपली संस्कृती जपणाऱ्या नऊवारी साडी नेसुन आजपर्यंत नव्वदच्यावर किल्ले सर केलेल्या सुवर्णा वायंगणकर आणि तिची माय, जगातल्या रंजलेल्या गांजलेल्या प्रत्येकाच्या वेदनेवर मायेचं मलम लावणाऱ्या श्रद्धा ताई आणि त्यांची माय, वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगावर मात करत स्वत:चा ‘तळेकरीण’ ब्रॅण्ड निर्माण करणारी वर्षा तळेकर आणि तिची माय, तृतीयपंथीय असुनही उच्चशिक्षित बनून स्वताची वेगळी ओळख बनवणारी निष्ठा निशांत आणि ह्या सगळ्या प्रवासात आपल्या मुलीला भक्कम आधार देणारी तीची माय. अशा मायलेकींच्या कर्तृत्वाचा सन्मान यावेळी करण्यात आला.
मायलेकींचं नातं हे जगाला माया, ममता, करुणेसह जिद्द, कर्तृत्वही दाखवतं हे या मायलेकींच्या कहाणीतून दिसते. त्यांची कहाणी जगासमोर यावी, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, यासाठी श्रीरंग फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याचे संस्थापक सुमीत पाटील सांगतात.यावेळी सत्कार मूर्तींसह श्रीरंग फाउंडेशनचे संस्थापक सुमित पाटील, गुरू देसाई, प्रकाश चौधरी, विश्वस्त आणि वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.