मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीच या किल्ल्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येणार्या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्यामुळे या किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. १५ सप्टेंबर या दिवशी राजभवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणार्या ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२३’ चे राज्यपालांच्या हस्ते वितरण झाले. या वेळी व्यासपिठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे हे उपस्थित होते.
ज्येष्ठ गिर्यारोहक आणि हिमालय पर्वताचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणार्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेने प्राप्त केला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने संतोष हसूरकर, अजित राणे आणि नितीन पाटोळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वांतत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि पुस्तके देऊन राज्यपाल रमेश बैस यांचा सन्मान केला.
या वेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले गड-दुर्ग केवळ महाराष्ट्राचे नाहीत, तर संपूर्ण देशाचा गौरव आहे. गड-दुर्ग आपल्या संस्कृतीचे रक्षक आहेत. त्यामुळे गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या गड-दुर्गांचे आम्ही संरक्षण करू. गिर्यारोहकांमुळे गड-दुर्ग यांचे महत्त्व समाजापर्यंत पोचत आहे.’’
गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी त्यांना प्राप्त झालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौ. मंजिरी मराठे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त केले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेश वराडकर आणि स्वप्नील सावरकर हेही उपस्थित होते.