Home स्टोरी शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते नव तेजस्विनी प्रदर्शनचा शुभारंभ.

शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते नव तेजस्विनी प्रदर्शनचा शुभारंभ.

98

सावंतवाडी: महिलांच्या अंगात कला कौशल्य गुण आहेत. त्यांनी नवनिर्माण करण्यासाठी शक्तीचा उपयोग करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी त्यासाठी सरकार महिलांसोबत आहे. असा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी येथील नव तेजस्विनी प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय व जिल्ह्यातील बचत गटांनी, बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे नव तेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शन २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सावंतवाडी जगन्नाथराव भोसले पटांगणावर मोती तलावाच्या गाठी आयोजित करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी दीपक केसरकर बोलत होते.

 

जिल्ह्यातील गरीब गरजू मागासवर्गीय विधवा परितक्त्या भूमीहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य करण्यात येत आहे. या आधारे या नव तेजस्विनी प्रदर्शन शुभारंभ केसरकर यांच्या हस्ते झाला.

यावेळी केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून उत्पादने विक्रीचे हे दालन सुरू करण्यात आले आहे. महिलांनी भाजीपाल्यासह फळ उत्पादने घेतली आहेत त्याचे कौतुक वाटते. भात लावल्यानंतर दुबार पीक जिल्ह्यात घेतले जात नाही ते घ्यावे आणि उत्पादनात वाढ करावी म्हणून मी गेले काही वर्ष प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात भात पिकाखाली ५५ सहस्त्र हेक्टर क्षेत्र आहे तर दुबार पीक ४ सहस्र हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते ते ५२ सहस्र हेक्टर क्षेत्रावर दुबार पीक घेतले तर स्वप्नातील आर्थिक क्रांती घडू शकते.

काथ्या उद्योगापासून देखील उत्पन्न मिळू शकते. आंबा काजू फणस बांबू अशा पिकावर देखील प्रक्रिया उद्योग करून उत्पन्न महिलांनी मिळवावे. १३० महिलांना उद्योग उभारण्यासाठी सिंधू रत्न योजनेतून कर्ज दिले आहे त्यांनी आर्थिक क्रांती घडवली पाहिजे. देशी कोंबडी देखील दिल्यानंतर त्यांची अंडी स्वीकारली जातात असे केसरकर यांनी सांगून खाडी व नदीकिनारी देखील माशांसाठी पिंजरे दिले आहेत. देशी गाई दिल्या आहेत काजू बोंडे, नारळ प्रक्रिया उद्योग करता येऊ शकतात. शिक्षण विभागाने नव्याने महिलांसाठी शिवण क्लास हा सुद्धा एक निर्णय घेतला आहे. महिलांनी आणि महिला बचत गटांनी अधिक मजबूतीने बचत गट सक्षम करून उत्पादने विक्री करून आर्थिक क्रांती घडवण्यासाठी संकल्प करावा असे आव्हान केसरकर यांनी यावेळी केले.

 

यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी स्वागत केले.