१९ जुलै वार्ता: विशाळगड किल्ल्यासहित महाराष्ट्रातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या आशियाचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील यांना देण्यात आले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे झालेली निदर्शनास येत आहेत. शिवरायांचे गडकिल्ले हा आपला अमूल्य इतिहास आहे आणि ह्या इतिहासाचे विकृतीकरण अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे ही सर्व अतिक्रमणे कोणताही धर्म, जात, संघटना यांच्या दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत राहून हटवण्यात यावी. विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्याची जी सुरुवात केलेली आहे याबद्दल आम्ही सर्व हिंदू समाजाच्यावतीने सरकारचे अभिनंदन करतो. या कारवाईमध्ये सरकारने कोणत्याही दबावाला बळी न पडता सातत्य राखावे. सकल हिंदू समाज आणि शिवप्रेमी सरकारच्या मागे खंबीर उभे आहोत. सरकारने महाराष्ट्र राज्यात इतर अनेक किल्ल्यावर जी अनधिकृत अतिक्रमणे झालेली आहेत ती सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काढून टाकण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा राजकीय फायदा करून घेणाऱ्या करणि धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.