पंढरपूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देवाची रोज एक नित्यपूजा करण्यात येते. त्यामध्ये चार यात्रांचा आणि इतर ठराविक कालावधी वगळून ३०० नित्यपूजांसाठी बुकिंग घेण्यात आलं. २०२४ सालच्या दैनंदिन नित्यपूजेच्या बुकिंगमधून विठ्ठल मंदिराला ७५ लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला ३३ लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. त्यासाठी भाविकांना मंदिर समितीकडे तारखेचं बुकिंग करून विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी २५ हजार आणि रूक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी ११ हजार रूपयांची रक्कम भरणं आवश्यक असतं. त्यानुसार त्या तारखेला संबंधित भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळून दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतोराज्यात दोन वर्षांपूर्वी कोरोना संकट सुरु झाल्याने शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद झाली आणि १८ मार्च २०२० पूर्वी ज्या भाविकांनी या नित्यपूजा नोंदणी केली होती त्या पूजा झाल्या नव्हत्या.
जानेवारी महिन्यात पुन्हा नित्य पूजा सुरू करण्यात आल्या. पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार विठ्ठल मूर्तीची झीज टाळण्यासाठी पूर्वी होत असलेल्या महापूजा बंद करून रोज होणाऱ्या नित्यपूजेत भाविकांना सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. त्यानुसार रोज पाच भाविक कुटुंबांची नित्यपूजेसाठी नोंद केली जाते.