सिंधुदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हा माझाच कार्यकर्ता असून त्यांना प्रथम नगरसेवक आणि नंतर पक्षाने त्यांना महापौरही केले. त्यांना जर खासदार व्हायचे असेल तर ‘प्रशांतला माझ्या शुभेच्छा’, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. निवडणुका ज्या वेळेस येतात, तेव्हा काही नवे चेहरेही द्यायचे असतात. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीतर्फे एकत्र बसून भुमिका ठरविणार असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आज शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख कारण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारला असता विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, वाढदिवसाच्या प्रशांतच्या बॅनरवर पुण्याचे भावी खासदार की शिरुर, मावळ किंवा बारामतीचा म्हटलंय, की राज्यसभेचे खासदार म्हटले ते माहिती नाही. त्यांच्या मनात काय आहे? ते प्रथम जाणून घेईन, मग बघू. मात्र राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार होत्या. अनेक इच्छुकांनी वेगवेगळ्या पध्दतीने आपले स्वतःचे मार्केटिंग केले. बॅनरबाजी केली, कामे केली, देवदर्शन करुन सर्व काही केले. झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले आहेत. ज्या वेळीस निवडणूक लागेल त्यावेळी बसून चर्चा करु. महाविकास आघाडीतर्फे एकत्र बसून काय भुमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, राजकीय परिस्थिती काय आहे, कोणाची ताकद किती आहे, मनपाच्या मागील निवडणुकीत कोणाचे किती नगरसेवक निवडून आले याचा आढावा घेऊ.