Home स्टोरी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार तब्बल तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार…! उदय सामंत 

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार तब्बल तीन लाखाच्या फरकाने निवडून येणार…! उदय सामंत 

147

पाणबुडी प्रकल्प होणारचं: विरोधकांच केवळ राजकारण 

सावंतवाडी प्रतिनिधी: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा शिवसेनेने जिंकला होता त्यामुळे त्या ही जागा शिवसेनेला मिळावा असा आमचा आग्रह असला तरीही याबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. मात्र, महायुतीचा उमेदवार हा तब्बल अडीच ते तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल, असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला. तर किरण सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केलं तरी आम्ही आमचा दावा सोडला नाही पाठिंबा देण्यात वावगं काय असेही ते म्हणाले.

राजापूर येथे होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने नियोजन बैठकीसाठी मंत्री उदय सामंत मंगळवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा मुख्य समन्वयक रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूर येथे आठ तारीख रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान मेळावा होणार आहे. त्या निमित्ताने जोरदार तयारी सुरू आहे. त्या मतदारसंघावर आम्ही दावा केला आहे. कारण हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेने जिंकला होता. या ठिकाणी असलेली शिवसेनेची ताकद लक्षात घेता येथे आम्ही उमेदवारी मागितली आहे परंतु याबाबत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवारच घेतील, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास किरण सामंत यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. माझ्या मते त्यात वावगं काहीच नाही. पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं म्हणजे आम्ही या मतदारसंघावरचा दावा अजिबात सोडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाणबुडी प्रकल्पावरून आमदार वैभव नाईक यांनी केलेली टीका आणि आंदोलन करण्याची घेतलेली भूमिका लक्षात घेता माझे त्यांना एकच सांगणे आहे की त्यांनी केलेले वक्तव्य खरं करून दाखवावं. नाहीतर हा प्रकल्प कोणामुळे गेला हे मी येऊन स्पष्ट करेन, असे आव्हान त्यांनी दिले.

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाला होता. त्यासाठी २४ कोटी रुपये मंजूर होते. परंतु या प्रकल्पाचे त्यावेळी टेंडर झाले नाही ही शोकांतिका आहे. परंतु हा प्रकल्प गुजरात मध्ये होतो याचा अर्थ तो महाराष्ट्रात होणार नाही हे चुकीचे आहे तो या ठिकाणी निश्चितच होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महायुतीतील सर्व नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. मात्र, कुरघोडीच्या वा श्रेयवादाच्या राजकारणात कोणी आपापसात जाहीर टिका टिप्पणी करु नये. कारण आमची लढाई ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार न मानणाऱ्यांना राजकारणातून बाजूला ठेवणे ही आहे. त्यामुळे सर्वांनी एकोप्याने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योजकांनी येण्यास पसंती दर्शवली आहे. तरी त्या ठिकाणी बेंगलोर मधील उद्योजक आले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा आयुष प्रकल्प तेथे होणार आहे तर परफ्यूम कंपनी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे निश्चितच आडाळी एमआयडीसीचा विकास होणार असल्याचे ते म्हणाले.