Home स्टोरी लहान वयापासून स्मार्टफोन (मोबाईल) वापरल्यास मानसिक आजारांचे प्रमाण अधिक!

लहान वयापासून स्मार्टफोन (मोबाईल) वापरल्यास मानसिक आजारांचे प्रमाण अधिक!

87

२० मे वार्ता: अमेरिका येथील ‘सेपियन लॅब्ज’ या संस्थेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले असून ‘तंत्रज्ञान लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे दुष्परिणाम करते ?’, हे त्यातून समोर आले आहे. जर लहान वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिला, तर मोठे झाल्यानंतर त्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.१. संशोधनानुसार जेवढ्या उशिरा मुलांच्या हातात स्मार्टफोन पडला, तेवढा त्यांच्यातील आत्मविश्‍वास आणि इतरांशी सकारात्मकतेने संबंध ठेवण्याची त्यांची क्षमता वाढल्याचे दिसून आले. तसेच ज्या मुलींना उशिरा स्मार्टफोन मिळाला, त्यांच्या दृष्टीकोनातील अनुकूलता आणि लवचिकता अधिक असल्याचे लक्षात आले.

२. जर मुलांना अतिशय लहान वयात स्मार्टफोन हाताळण्यास मिळाला, तर त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांच्या प्रती आक्रमकतेची भावना, वास्तवापासून दूर रहाणे, अशा अनेक मानसिक आरोग्याशी निगडित समस्या दिसून आल्या.

३. ‘एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन अँड मेंटल वेलबिइंग आऊटकम्स’ (स्मार्टफोन प्रथम वापरतांनाचे वय आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा होणारा परिणाम) या नावाने हे संशोधन १४ मे या दिवशी प्रकाशित करण्यात आले.

४. जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत १८ ते २४ वर्षे वयोगटांतील २७ सहस्त्र ९६९ मुलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. उत्तर अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथील ४१ देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. भारतातील ४ सहस्त्र युवकांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता.

भारतासारख्या युवा देशासाठी आत्यंतिक चिंतेचे सूत्र! ‘सेपियन लॅब्ज’चे संचालक शैलेंदर स्वामीनाथन् यांनी या संशोधनासंदर्भात म्हटले की, तंत्रज्ञानाचा अतिरेक लहान मुले आणि युवक यांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम करते? हे या संशोधनातून दिसून येते. भारतासारख्या देशासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारतात १५ ते २५ या वयोगटांतील मुलांची संख्या अनुमाने २० कोटी आहे. त्या अनुषंगाने या संशोधनातील निष्कर्ष शाळा, पालक आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरतील. भारतातून केवळ ४ सहस्त्र मुलांचा या संशोधनात सहभाग असला, तरी हे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील तब्बल ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे.