Home स्टोरी राष्ट्रकल्याणासाठी ग्राम अभियान राबवा! गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

राष्ट्रकल्याणासाठी ग्राम अभियान राबवा! गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

120

गुरुदर्शनासाठी दिंडोरी दरबारी सेवेकर्‍यांची अलोट गर्दी…..

नाशिक (प्रतिनिधी):- सेवेकर्‍यांनी निरपेक्ष वृत्तीने राष्ट्रकल्याणासाठी तळागाळात ग्रामअभियान राबवावे, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले.दिंडोरी प्रधान केंद्रात रविवार दि. 2 जुलै रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे- मार्गदर्शन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदर्शन सोहळा झाला. त्यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींनी देशभरातून आलेल्या सेेवेकर्‍यांशी संवाद साधला. गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, या विश्वाचे चालक, मालक व पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असून गुरुतत्त्वही तेच आहेत. स्वामी महाराजांना दु:खी, पीडित आणि कष्टी जनतेची केलेली सेवा विशेष प्रिय आहे. ही सेवा ग्राम अभियानातून शक्य आहे. त्यामुळे सेवेकर्‍यांनी ग्राम अभियान झोकून देऊन राबवावे, राज्यात, देशात, गावागावात, वाड्या-वाड्यांवर जाऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून स्वामी महाराजांचे सेवाकार्य करा असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले.सेवामार्गाने विना हुंडा, सोन-नाणं, अगदी अल्प खर्चात साखरपुड्यासारख्या विधीत विवाहाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे भविष्यात कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह सेवामार्गातर्फे केले जातात. या उपक्रमासाठीही सेवेकर्‍यांनी योगदान द्यावे असे गुरुमाऊलींनी नमूूद केेले.

खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी स्वत: उत्पादित केलेल्या बियाण्यांचा वापर करावा आणि सेंद्रिय शेती करावी जेणेकरुन सर्वांना विषमुक्त अन्न मिळेल. पेरणी करण्यापूर्वी बी,पाणी आणि माती परीक्षण अवश्य करावे. असाध्य आजार टाळण्यासाठी आहारातून वांगी, मिरची, उडीद, मका, बाजरी, वाल, वाटाणा हे पदार्थ वर्ज्य करावेत आणि वात, कफ, पित्त यांचे संतुलन राखण्यासाठी घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे अशी सूचना त्यांनी केली.सदाचार आणि संपन्न, विकारापासून मुक्त हीच भारतीय संस्कृती असून आमच्या माता भगिनींनी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचे जतन केले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नद्यांची स्वच्छता करा, नद्या दूषित होणार नाहीत याची दक्षता घ्या, सव्वा कोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियानात सहभाग घ्या, प्रत्येकाने किमान ५ वृक्षांची लागवड करा असेही त्यांनी आवर्जून सांगितले.