सिंधुदुर्ग प्रतिनिधी: संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ हे चित्रपट दाखवण्यास विरोध करत आहे; कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे. उद्धव ठाकरे आणि या सर्वांचे राजकीय धर्मांतर झाले आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अन् त्यांचे नेते संजय राऊत यांच्यावर केली.आमदार राणे यांच्या हस्ते तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वांत उंच म्हणजे ७५ फूट उंचीच्या स्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राणे यांनी प्रहार भवन येथे पत्रकार परिषद घेतली.

या वेळी राणे पुढे म्हणाले, ‘‘मी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी विनंती करणार आहे. ‘द केरल स्टोरी’सारखाच काही दिवसांत ‘दिशा सालियन फाईल्स’ हा चित्रपटही ओ.टी.टी.वर येणार आहे.’’ मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव गुजरातमधून आखला जात आहे, असे सांगणार्यांना गुजराती लोकांचा पैसा कसा चालतो? त्यामुळे राजकारणासाठी द्वेष पसरवणे बंद करा, अशी चेतावणी आमदार राणे यांनी या वेळी दिली.कणकवली येथील निवासस्थानी आमदार राणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील १०० गरजू विद्यार्थिनींना सायकलचे विनामूल्य वितरण केले. यापूर्वी ११० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले होते.