Home स्टोरी येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे...

येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केली पाहणी!

55

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – येत्या पावसाळ्यापूर्व नाले सफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि नाले सफाईचे काम व्यवस्थित रित्या न झाल्यास संबंधीतास बीलाची अदायगी केली जाणार नाही आणि त्यास ब्लॅक लीस्टमध्ये टाकण्याची कारवाई केली जाईल असे निर्देश दिले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण व डोंबिवलीतील नाल्यांची पाहणी करतेवेळी हे निर्देश दिले.

यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, परिमंडळ – २ च्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मनोज सांगळे, सहा.आयुक्त तुषार सोनवणे, भारत पवार व इतर अभियंता उपस्थित होते. नाले सफाईची कामे जोरात सुरु झाली असून पुढील काही दिवसात नाले सफाई पूर्ण होईल आणि नाल्यातील गाळ, कचरा काढून टाकण्यात येईल, जेणेकरुन पाऊस येण्यापूर्वी हे नाले चांगल्यापध्दतीने प्रवाहीत होतील असे ते पुढे म्हणाले.

महापालिका आयुक्तांनी आज कल्याण पश्चिम येथील महालक्ष्मी हॉटेल, सांगळेवाडी, सर्वोदय मॉल या परिसरातील जरीमरी नाल्याची पाहणी केली. तद्नंतर डोंबिवली येथील निळजे खाडी किनारा परिसर, निळजे लोढा परिसरातील रस्ता दुरुस्ती कामाची तसेच एमआयडीसीतील रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी व नाल्याची पाहणी केली त्याचप्रमाणे साईबाबा मंदिर ते कावेरी स्वीट मार्ट येथील नाला, रामचंद्रनगर नाला, देसलेपाडा येथील डांबरीकरण तसेच म्हसोबा चौक (९० फीट रस्ता) येथील नाल्याची पाहणी केली आणि नाले साफसफाईची कामे वेळेत पूर्ण करणेबाबत संबंधीत ठेकेदारांना कठोर निर्देश दिले. महापालिका क्षेत्रात एकूण ९५ कि.मी. रुंदीचे ९७ नाले आहेत.