Home स्टोरी युद्ध हा काही आता पर्याय नाही!पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ….

युद्ध हा काही आता पर्याय नाही!पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ….

158

२ ऑगस्ट वार्ता: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफयांनी युद्ध हा पर्याय नसून, आपण भारतासह चर्चेसाठी तयार आहोत असं म्हटलं आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ बोलत होते. “जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर असेल तर आपण (पाकिस्तान) चर्चेसाठी तयार आहोत,” असं शहबाज शरीफ यांनी सांगितलं आहे. “गेल्या 75 वर्षात भारत आणि पाकिस्तानने तीन युद्धं लढली आहेत. या युद्धांमुळे गरिबी, बेरोजगारी आणि साधनांची कमतरता निर्माण झाली. युद्ध हा काही आता पर्याय नाही,” असं शहबाज शरीफ म्हणाले आहेत. शहबाज शरीफ यांनी 1965 (काश्मीर युद्ध), 1971 (बांगलादेश विभाजन), 1999 (कारगील युद्ध) यांचा उल्लेख केला आहे. या तिन्ही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला. ते म्हणाले “पाकिस्तानकडे अण्वस्त्रं आहेत. पण ही अण्वस्त्रं आक्रमक होण्यासाठी नाही, तर आपली रक्षा करण्यासाठी आहेत. परमेश्वराने असं करु नये, पण जर उद्या अण्वस्त्र युद्धाची स्थिती निर्माण झाली तर काय झालं होतं हे सांगण्यासाठी एकजणही जिवंत नसेल. युद्ध हा पर्याय नाही”.पाकिस्तान एकीकडे शांततेसाठी चर्चा करत असला, तरी दुसरीकडे आपल्या अण्वस्त्रांमध्ये वाढ करत आहे. गेल्या एक वर्षात पाकिस्तानने 5 अण्वस्त्रं आपल्या शस्त्रसाठ्यात जमा केली आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या जून 2023 च्या अहवालानुसार, चीनने गेल्या एका वर्षात 60 अण्वस्त्रे वाढवली आहेत. रशियाने 12, पाकिस्तानने 5, उत्तर कोरियाने 5 आणि भारताने 4 शस्त्रे वाढवली आहेत. अहवालानुसार, अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 164 आहेत.