Home स्टोरी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा! – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा! – मंत्री रवींद्र चव्हाण

153

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप या मार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत आणि होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.मंत्री चव्हाण यांनी १८ एप्रिल या दिवशी नवी मुंबई येथील ‘कोकण भवन’ येथे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांविषयी आढावा बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मंत्री चव्हाण यांनी पुढील सूचना संबंधित विभागांना दिल्या.

१. गुहागर-चिपळूण-कराड या रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) या एकूण २१ कि.मी.च्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्याच्या प्रस्तावास मान्यता देऊन संबंधित काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करावे आणि रस्त्याची कामे मार्गी लावावित. चिपळूण पागनाका (७०० मी.) आणि सावर्डे शहरातील उड्डाण पुलाचा (१ सहस्र २५० मीटर) प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करून उड्डाण पुलांची कामेही मार्गी लावावित.

२. कोकणातील महामार्गांवरील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देण्याच्या दृष्टीने ‘रायगड जिल्ह्यातील अलिबाग-वडखळ रस्ता (२२.२०० किलोमीटर) महामार्गाच्या दर्जाचा करणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीच्या कामास मान्यता मिळाली असून उर्वरीत १४.३० कि.मी. अंतराचा रस्ताही महामार्गाच्या दर्जाचा करावा.