Home स्टोरी महिला एस. टी. वाहक सारिका म्हाडगुत यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्कार प्रदान.

महिला एस. टी. वाहक सारिका म्हाडगुत यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव’ पुरस्कार प्रदान.

606

सावंतवाडी प्रतिनिधी: कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशन सेवाभावी संस्थेतर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ यावर्षी सावंतवाडी एसटी आगारातील महिला वाहक सौ. सारिका शशांक टिळेकर ऊर्फ सारिका म्हाडगूत यांना प्रदान करण्यात आला. पन्हाळा गडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नात व महाराष्ट्राच्या मुख्य प्रबंधक डमुनी मुर्मू यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

अविष्कार फाउंडेशन दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करते. यावर्षी एसटी महामंडळात, विशेषतः सावंतवाडी एसटी आगारात गेली सतरा वर्षे सेवाभावी वृत्तीने आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला वाहक सारिका माडगूत, म्हणजेच साक्षी टिळेकर यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

कलंबिस्त येथील रहिवासी असलेल्या सौ. सारिका उर्फ साक्षी टिळेकर यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंत हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरी स्वीकारली. गेल्या १७ वर्षांपासून त्या सावंतवाडी एसटी आगारात एक आदर्श वाहक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सेवेत त्यांनी अनेक गरजूंना दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशा प्रकारचे कार्य केले आहे.

वाहकाचे पवित्र कार्य करत असताना प्रवाशांना उत्तम सेवा देणे हे त्यांनी आपले केंद्रबिंदू मानले आणि एसटी महामंडळाच्या नियमावलीनुसार ‘प्रवासी हे दैवत’ मानून त्यांनी काम केले. लांब पल्ल्याच्या बेळगाव, कोल्हापूर, पुणे या मार्गांवर त्यांनी वाहक म्हणून अनेकदा प्रवास केला आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना त्यांनी विशेष सेवा देत आपले वाहकाचे कार्य उत्कृष्टपणे बजावले आहे.

एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, या दृष्टीनेही त्यांनी आपल्या सतरा वर्षांच्या सेवेत प्रामाणिक कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू, विशेष निमंत्रक मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सुरेखा लांबतुरे, राष्ट्रीय महासचिव सुनीता केदार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत मेत्तर आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. सारिका म्हाडडगूत -टिळेकर यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीने एसटी महामंडळात वाहक म्हणून स्थान मिळवले. त्यांनी आपल्या सतरा वर्षांच्या सेवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी आगारात महिला वाहक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा’बद्दल सावंतवाडी एसटी आगाराचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी वर्ग आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

फोटो – सावंतवाडी एसटी आगार वाहक सारिका उर्फ साक्षी टिळेकर माडगूत यांचा महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना बँकेच्या महाप्रबंधक डोमिनो मुर्मू, महिला आयोगाच्या सदस्य सुरेखा लांबतुरे, सुनीता केदार, संजय पवार आदी.