२४ सप्टेंबर वार्ता: ब्रिटिश कोलंबिया प्रांतात महत्त्वाच्या ठिकाणी खलिस्तानी समर्थकांनी आपला प्रोपगंडा रेटण्यासाठी होर्डिंग, बॅनर लावले होते. आता हे होर्डिंग आणि बॅनर हटवले जात आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी आणि दहशतवादी समर्थकांविरुद्ध भारताच्या दबावानंतर कॅनडा प्रशासनाने होर्डिंग आणि बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कॅनडातील सरेमध्ये एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांची हत्या करण्याचं आव्हान करणारी पोस्टर्स हटवली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना मुद्द्याचे गांभीर्य आणि कॅनडातून येणाऱ्या अशा संदेशांच्या शक्यतेची जाणीव झाल्यानंतर सरे गुरुद्वाराला तीन भारतीय राजदूतांच्या हत्येसाठी भडकावणारी पोस्टर्स हटवण्यास सांगितले होते. तसंच गुरुद्वारा व्यवस्थापनाला इशाराही दिला आहे की कोणत्याही कट्टरपंथीय घोषणेसाठी लाउडस्पीकरचा वापर करू नये. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे हा प्रमुख भाग असून या भागातले भारतविरोधी घोषणा आणि भावना भडकावणाऱ्या गोष्टी हटवल्या जात आहेत. याशिवाय कॅनडा-अमेरिका सीमावर्ती भागातील खलिस्तानी समर्थक संघटनांना अशी पोस्टर्स काढण्यासाठी सांगण्यात आलं आहे.