मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): बीएसएनएल चा मसुरे येथील टॉवर नादुरुस्त झाला असून मागील आठवडा भर सेवेत व्यत्यय येत आहे. थ्री जी सेवा न मिळणे, फोन कट होणे, रेंज अचानक गायब होणे आदी प्रकार मागील आठवडा भर चालू आहेत. मोबाइल इंटरनेट सेवा ही सध्या अत्यावश्यक बाब बनली आहे. बँक, पोस्ट, ग्रामपंचायत, रेशनिंग, अशी महत्वाची कार्यालये मसुरेत असल्याने ग्राहकांना रेंज नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अत्यावश्यक वैधकीय सेवेसाठी संपर्क साधणे अवघड बनत आहे.
मसुरे येथे कोणीही कर्मचारी ग्राहकांची तक्रार घेण्यासाठी उपलब्ध नसल्याने गाऱ्हाणे मांडावे तर कुणाकडे असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. मालवण वरून अधिकारी वर्ग सुद्धा दखल घेत नसल्याने टॉवर किंवा एक्सजेंज मध्ये झालेला बिघाड तातडीने दुरुस्त न झाल्यास मालवण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा मोबाइल ग्राहक यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्याची मागणी पुढे येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास लगेच रेंज मध्ये व्यत्यय येत असल्याने आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.








