Home स्टोरी प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

114

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या येथील समाधी मंदिरात २८ ऑक्टोबर यादिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. यानिमित्त सहस्रो भाविकांनी प.पू. राऊळ महाराज आणि प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले अन् महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

यानिमित्त २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी प्रारंभ करण्यात आलेल्या ‘वर्णावी ती थोरवी’ या ग्रंथ वाचनाची २८ ऑक्टोबर या दिवशी सांगता करण्यात आली, तसेच पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज आणि प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गायन, प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य उपक्रमाच्या अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य देणे, दुपारी आरती, दुपारी १ ते रात्री १० या कालावधीत महाप्रसाद, भजन, दुपारी २.३० ते ३.३० प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या पत्नी प.पू. बाईमा आणि अन्य सुवासिनी यांच्या हस्ते प.पू. राऊळ महाराज यांच्या बालमूर्तीला पाळण्यात घालून झोका देण्यात आला. त्यानंतर भजने, सांजआरती, प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या पादुकांची पालखी मिरवणूक आणि त्यानंतर प.पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनीबुवांचे भजन, असे कार्यक्रम झाले.