Home क्राईम नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाइकांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय !

नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाइकांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय !

167

नीलिमा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण. पोलिसांनी वेळीच हालचाल केली असती, तर नीलिमाचा जीव वाचला असता!

चिपळूण: लुक्यातील ओमळी गावातील तरुणी नीलिमा चव्हाण यांच्या मृत्यूला ५ दिवस होत आले, तरीही या प्रकरणातील आरोपींना कह्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. ‘पोलिसांनी त्याच वेळी हालचाल केली असती, तर नीलिमाचा जीव वाचला असता’, अशी भावना नीलिमा यांच्या भावाने व्यक्त केली आहे. ‘जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम आम्ही करत आहोत’, असा आरोपही नीलिमाचे नातेवाइक करत आहेत. एकूणच नातेवाइकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

नीलिमा चव्हाण या दापोलीत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामाला होत्या. २९ जुलैला दापोलीतून त्या ओमळी येथे घरी येत असतांना बेपत्ता झाल्या. त्यामुळे त्यांच्या भावाने तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या वेळी पोलिसांचे अपेक्षित असे सहकार्य मिळाले नसल्याचे नीलिमा यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले. ‘बहिणीचे सायंकाळी ५ वाजताचा भ्रमणभाष ठावठिकाणा (लोकेशन) कोंडिवली धरणाजवळ होते. त्या वेळी पोलिसांना आम्ही तेथे जाण्याची विनंती केली. निदान खेड पोलिसांना बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे (‘वायरलेस’द्वारे) तरी कळवा, असेही सांगितले; पण पोलिसांनी सकारात्मकता दर्शवली नाही. रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा तिचा ठावठिकाणा आंजणी रेल्वेस्थानक दाखवले. थोडक्यात ती त्याच परिसरात होती. पोलिसांनी लवकर कारवाई केली असती, तर बहीण सुखरूप भेटली असती. या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा आहे आणि हा १०० टक्के घातपात आहे. आमच्यावर हा अन्याय झाला असून न्याय मिळाला पाहिजे’, अशी मागणी नातेवाईक करत आहेत.

व्हिसेरा’ अहवालातून मृत्यूचे कारण समजणार! नीलिमा चव्हाण यांचा मृतदेह १ ऑगस्ट या दिवशी दाभोळ खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणाचे पोलीस अन्वेषण करत आहेत. या प्रकरणातील गूढ अद्यापही कायम असले, तरी नीलिमा यांचा ‘व्हिसेरा’ काढून ठेवण्यात आला आहे. ‘व्हिसेरा’च्या अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे म्हटले जात आहे.‘मुलगी बेपत्ता दापोलीत झाली आणि तक्रार येथे देता?’, असे सांगून पोलिसांनी प्रथमपासूनच नकारात्मकता दर्शवली.