Home स्टोरी नंदकुमार पेडणेकर राज्यस्तरीय स्वामी रत्न पुरस्काराने सन्मानित!

नंदकुमार पेडणेकर राज्यस्तरीय स्वामी रत्न पुरस्काराने सन्मानित!

139

सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन पुणे येथे गौरव.

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोट संचलित समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समितीच्या वतीने हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांना “स्वामी रत्न ” या राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत सौ. नीलम नंदकुमार पेडणेकर उपस्थित होत्या. पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात असंख्य स्वामीभक्तांच्या साक्षीने झालेल्या संदेश स्वामींचा या सोहळ्यात पेडणेकर यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वे. शां. सं. अण्णू महाराज यांच्या शुभहस्ते त्यांना स्वामींची शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास राज्यातून अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समर्थ नगरीचे अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांनी केले.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे व वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले, नंदकुमार पेडणेकर यांचे स्वामी कार्य मोठे आहे. कोकणात देवगड तालुक्यात हडपीड येथे भव्य दिव्य स्वामी मठ उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मठाच्या माध्यमातून स्वामी भक्तांना अक्कलकोट दर्शन, आरोग्य शिबीर, ओसाड जमिनीवर वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी विशेष योजना ते राबवत असतात. स्वामीं नामाचा प्रचार प्रसार होण्यासाठी मोठे योगदान पेडणेकर यांचे आहे. मठाच्या माध्यमातून आज अखेर स्वामींचा प्रचार प्रसार व्हावा या शुद्ध हेतूने अनेक स्वामीमय उपक्रम राबवून हजारो स्वामी भक्त त्यांनी तयार केले आहेत. पेडणेकर यांनी आज अखेर जी स्वामी सेवा केली आहे, जे चांगले कार्य केले आहे त्या सेवेची एक त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणून हा त्यांचा आज हा गौरव होत आहे. याचा मला अभिमान आहे. दुसऱ्यांना स्वामी सेवा करण्यास प्रोत्साहन देणारे स्वामी भक्त तयार व्हायला हवेत. असेही ते म्हणाले.

कार्यक्रम प्रसंगी पुणे येथील प्रसिद्ध गायिका कृपा नाईक यांनी गायलेल्या स्वामींच्यावर आधारित भक्ती गीतांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. तसेच स्वामींच्या रक्तचंदन पादुकांचे दर्शन, सामुदायिक नामस्मरण व शंकरबाबा महाराज यांच्या शीदा प्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास पुणे येथील स्वामी भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.