Home स्टोरी दोन दिवसात कारभार सुधारा! अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सरपंच संघटनेचा...

दोन दिवसात कारभार सुधारा! अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सरपंच संघटनेचा इशारा…..

124

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गावागावात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा तसेच विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे होणारी मनुष्यहानी वित्त आणि तसेच गोधनाची आणि या पार्श्वभूमीवर ग्राहकांना उद्भवत असलेल्या विविध समस्यांबाबत सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे उपअभियंता,महावितरण, सावंतवाडी यांचे लक्ष वेधण्यात आले. दोन दिवसात याबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास २८ जुलै रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, संघटनेचे माजी संघटक सुरेश गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील गावागावात महावितरणच्या एकंदरीतच व्यवस्थेचा खेळ खंडोबा झाला आहे. अनेक भागात विद्युत खांब उन्मळून पडत असून विद्युत वाहिन्याही तुटत आहेत. या तुटत असलेल्या विद्युत भारित वाहिन्यामुळे मनुष्यहानी वित्तहानी तसेच गोधनाची हानीही होत आहे. तर वारंवार असे प्रकार होत असल्याने गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामस्थांना त्यामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळी हंगामात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून याबाबतची उपाययोजना केली जात नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन देखील सदर विभागाकडून त्याबाबत कोणतेही दखल घेतली जात नाही. विशेषतः पावसाळ्यात अशा समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. गावात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तसेच अन्य विजेच्या संदर्भात कोणतीही समस्या उद्भवल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तसेच अभियंत्यांनाही संपर्क साधला असता साधे फोन उचलले जात नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा गंभीरतापूर्वक विचार करून याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात यावी अन्यथा येत्या दोन दिवसात अर्थात २७ जुलै पर्यंत सर्व सुरळीत न केल्यास २८ जुलै रोजी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.