Home स्टोरी दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित गावातील समस्या कायम:

दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित गावातील समस्या कायम:

102

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित गावातील शेतकऱ्यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दि. २४ ऑगस्ट दिवशी भेट घेतली खरी मात्र दि. २९ ऑगस्ट ला वनमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीव्यतिरिक्त अन्य कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने तिलारी पंचक्रोशीतील हत्तीबाधित शेतकऱ्यांची निराशा झाली.केवळ पंधरा मिनिटे हत्तीबधितांशी झालेल्या चर्चेत हत्तीसमस्येवर तोडगा काढू तुम्ही दि.२९ ऑगस्ट ला वनमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित रहा असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

तिलारी खोऱ्यातील गावात हत्तींची समस्या ज्वलंत आहे. मात्र हत्तींचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने काही दिवसांपूर्वी हत्तीबाधीत शेतकऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते त्यावेळी वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्या साऱ्या पार्श्वभूमीवर ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घोटगेवाडी दत्तमंदिर येथे हत्तीबाधित गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.

यावेळी हत्तीबाधित गावकर्यांच्यावतीने मोरले गावचे माजी उपसरपंच पंकज गवस यांनी हत्तीमुळे निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. हत्तीसमस्या ही आमची व्यथा आहे त्यामुळे तुम्ही ती हत्तींचा कायमचा बंदोबस्त करून दूर करा अशी मागणी त्यांनी केली . तर पालकमंत्र्यांनी तुम्ही उपाययोजना सुचवा असे सांगितले असता श्री.गवस यांनी आम्ही शेतकरी यातील तज्ञ नाही तुम्ही तज्ञांशी बोलून कायमस्वरूपी उपाय करा अशी विनंती केली तर माजी उपसभापती राजेंद्र निंबाळकर यांनी सीमेवर खंदक खोदावे व लोखंडी रॉड चे कुंपण केल्यास हत्तींचा बंदोबस्त होऊ शकतो असे सुचविले. अखेर तुम्ही शिष्टमंडळ घेऊन २९ ऑगस्ट ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणाऱ्या बैठकीस उपस्थित रहा , त्याठिकाणी तुमचे मुद्दे मांडा तेच यावर योग्य निर्णय देतील असे सांगून बैठक आटोपती घेतली. त्यामुळे या बैठकीत पालकमंत्री ठोस काहीतरी आश्वासन देतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली.