Home सनातन देशाच्या राजधानीत ‘सनातन राष्ट्रा’चा भव्य शंखनाद !

देशाच्या राजधानीत ‘सनातन राष्ट्रा’चा भव्य शंखनाद !

43

नवी दिल्ली: पूर्वी जिहादी आतंकवादी वाट्टेल तिथे स्फोट करायचे, आता ते स्फोट करण्याआधी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मोठ्या संख्येने आतंकवादी मारले जात आहेत. त्यामुळे सेक्युलवाद्यांच्या पोटात दुखत आहे. आता ती पोटदुखी पुढे आणखीन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यांनी दिल्लीत स्फोट करून लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी आमच्यात भय निर्माण होणार नाही. उलट तुम्ही जेवढे जिहादी आतंकवादी निर्माण कराल, तेवढे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी निर्माण होतील, असा स्पष्ट इशारा दिल्लीचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. कपिल मिश्रा यांनी दिला.

 

ते देशाची राजधानी दिल्ली येथील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. महोत्सवाच्या प्रारंभी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. शंखनाद आणि वेदमंत्र पठण झाल्यानंतर प.पू. शांतिगिरी महाराज, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक श्री. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृति समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सावाचे उद्घाटन झाले.

 

या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. कपिल मिश्रा पुढे म्हणाले की,* पूर्वीच्या सरकारच्या काळात राष्ट्राच्या खऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचा विरोध असायचा, तसेच त्यावर चर्चा कुठे करायची, असा प्रश्न निर्माण व्हायचा; मात्र आज होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांचेही समर्थन आहे. यापुढील काळात धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण व उत्थान यांच्यासाठी सतत कार्यरत रहाण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.

 

या वेळी प्रारंभी ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून राष्ट्रीत्वाची भावना जागृत केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचेही सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. उद्घाटनप्रसंगी हजारो वर्षापूर्वींच्या श्री सोरटी सोमनाथाच्या ज्योतीर्लिंगाचे दिव्यांशाचे सर्वांना दर्शन घडवण्यात आले. या वेळी त्याचे संतांच्या हस्ते पूजन करून त्याचे माहात्म सांगण्यात आले. उद्घाटन समारंभात सनातन संस्था निर्मित ‘संकल्प रामराज्य का’ या हिंदी ग्रंथाचे, तर संरक्षण मंत्रालयाचे अपर सचिव श्री. वेदवीर आर्य लिखित ‘क्रॉनोलॉजी ॲन्ड ओरिजिन्स ऑफ इन्डो युरोपियन सिविलाइजेशन’ या इंग्रजी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

भारत ‘विकृती सामुग्री मुक्त’ देश व्हावा, असे ध्येय ठेवूया ! – उदय माहुरकर

 

आज ‘ओटीटी’, सामाजिक माध्यमे आदींच्या माध्यमांतून अश्लिलतेचा प्रचार केला जात आहे. हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी देशातील शिक्षा पद्धती कठोर होणे आवश्यक आहे. भारत ‘विकृती सामृगी मुक्त’ देश व्हावा, असा संकल्प देशवासियांनी घ्यायला हवा, असे आवाहन श्री. उदय माहूरकर यांनी केले.

दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी अडीच आघाड्यांवर लढणे आवश्यक ! – श्री. अभय वर्तक

 

या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले की, आज देशात एकही जिल्हा व राज्य असे नाही की, जेथे आतंकवाद्यांचे स्लीपर सेल नाहीत. दोन आघाड्यांवर सेना आणि सरकार लढत आहे. अर्ध्या आघाडीवर जनतेला लढायचे आहे. तरच या आतंकवाद्यांना पायबंद बसणार आहे. यासाठी देशाच्या राजधानीत, कुरूक्षेत्राजवळ ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करत आहोत.

 

हा महोत्सव SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर लाइव्ह पहावा, तसेच भारत मंडपम्‌च्या प्रांगणातील हॉल क्र. १२ मध्ये लावण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन पहायला सर्वांनी अवश्य यावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आपला नम्र, श्री अभय वर्तक,

प्रवक्ता, सनातन संस्था, (संपर्क : ९९८७९ २२२२२)