Home स्टोरी देवस्थान जमिनींवरील कुळांचे नाव कमी करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या.

देवस्थान जमिनींवरील कुळांचे नाव कमी करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या.

7

सावंतवाडी: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली असलेल्या देवस्थान मालकीच्या जमिनी व मिळकर्तीवरील कुळांची (शेतकरी) नावे महसूल दप्तरातून कमी करण्याच्या अलीकडील आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहस्र कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीच्या जमिनीवरील कुळांची नावे कमी करण्याच्या या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

याविषयी निवेदन सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी मंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेत सादर केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब, सचिव राजाराम सावंत, खजिनदार विलास गवस, सदस्य साबाजी धुरी, मधुकर देसाई आदी उपस्थित होते.

 

या निवेदनात म्हटले की, , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २४३ देवस्थाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली येतात. या देवस्थानांच्या मालकीच्या जमिनींच्या संदर्भात नुकताच एक आदेश निर्गमित करण्यात आला आहे, ज्यानुसार या जमिनींवरील इतर कुळांची नावे कमी करण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.

 

जमिनींच्या कागदोपत्री नोंदी देवस्थानच्या नावावर असल्या तरी, गेल्या अनेक पिढ्यांपासून याच जमिनींवर देवस्थानाचे पुजारी, सेवेकरी आणि स्थानिक ग्रामस्थ शेती करून आपली उपजीविका करत आहेत. तसेच, या बदल्यात ते देवस्थानाची सेवा देखील करत आले आहेत.

 

“अशा परिस्थितीत कोणतीही सखोल चौकशी न करता आणि प्रत्यक्ष वापरहक्क व सेवा विचारात न घेता, अचानकपणे कुळांची नावे कमी करण्याचा निर्णय घेतल्यास या कुटुंबांवर मोठा अन्याय होणार आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे. यामुळे केवळ सामाजिक स्तरावरच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

सध्याच्या परिस्थितीत, प्रत्यक्ष मालकी हक्क आणि जमिनीचा वापर करणारे घटक याबद्दल स्पष्टता येण्यासाठी पुरेसा वेळ आणि सखोल चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, कोणतीही एकतर्फी कारवाई न करता, सर्व संबंधित पक्षकारांची बाजू ऐकून घेऊनच या संवेदनशील विषयावर निर्णय घेणे योग्य ठरेल.

 

या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्काळ स्थगिती देऊन, पुढील काळात योग्य पडताळणी तसेच न्याय्य व पारदर्शक पद्धतीने या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली असून पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन संबंधित विभागाला त्वरित स्थगितीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या देवस्थानाची सेवा करणाऱ्या कुटुंबांवर अन्याय होणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

 

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी निवेदन स्वीकारून  योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अशी ग्वाही सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.