Home स्टोरी दुर्गवीर प्रतिष्ठान,महाराष्ट्रने राबवली किल्ले रामगडावर श्रमदान मोहीम!

दुर्गवीर प्रतिष्ठान,महाराष्ट्रने राबवली किल्ले रामगडावर श्रमदान मोहीम!

107

मसुरे प्रतिनिधी: सोमवार दि.१० जुलै २०२३ रोजी मालवण तालुक्यातील किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वा. सर्व दुर्गवीर किल्ले रामगडवर जमा झाले. प्रथम गडदेवता, श्री गणेशाची ची आराधना करुन शस्त्रपूजन करण्यात आले.त्यानंतर ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेऊन सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये मोहिमेस प्रारंभ केला.

पाऊसाचे दिवस असल्यामुळे गडांवरील वास्तु,अवशेष यांवर गवत-झाडी उगवल्याने वास्तू झुडूपात झाकून जातात. यामुळे वास्तूंचे नुकसान होतेच शिवाय पावसाळ्यात गडावर येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण गडफेरी होत नाही याच गोष्टीची दखल घेऊन या मोहिमेत गडावरील गणेश मंदिर परिसरातील झाडी-गवत साफ करत मंदिर परिसर मोकळा करण्यात आला. या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे मिलिंद चव्हाण, गणेश मालंडकर, तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, रोहन साटम, ग्रामस्थ भालचंद्र पवार, प्रमोद मगर आदी सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट् ही गडकिल्ल्यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते अभेद्य गडकोट आणि स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणा-या मावळ्यांच्या जीवावर. परकीय आक्रमणातून महाराष्ट्रातील जनतेचं ज्या गडकिल्ल्यांनी संरक्षण केलं, छ.शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवलं, स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यांवर चालला तो ऐतिहासिक वारसा जतन व्हावा व पुढील पिढ्यांसाठी टिकून रहावा यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान 2008 पासून अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. गडकिल्ले संवर्धनासोबतच विविध सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक मराठमोळे सण-उत्सव गडावर साजरे करून गड जागता ठेवत स्थानिकांमध्ये गडांबद्दल आस्था निर्माण करण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानचा संकल्प आहे. परंतु सदर कार्य हे नक्कीच कुणा एका-दोघांच्या आवाक्यातील नाही. यासाठी गरज आहे ती कित्येक हातांची म्हणूनच सर्व गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी या गडसंवर्धन कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आणि या शिवकार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क: मो. 9403229230 / 9702878920..