पोलीसांकडून टाळाटाळ होत असल्याचा पेडणेकर कुटुंबियांचा आरोप.
वेंगुर्ले: येथील शासकीय सेवेत असलेल्या दीक्षा चौकेकर या महिलेची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप तिच्या भावाने केला होता. मात्र, त्या नंतरही आवश्यक ते ठोस पुरावे असताना परिस्थितीजन्य पुरावेच नष्ट करण्याचे प्रयत्न करुन एफआयआर दाखल करण्यास पोलीसांकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप वसंत पेडणेकर यांनी करत राज्य मानवी हक्क आयोगाकडे याबाबत दाद मागितली आहे.
आयोगाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सौ. दिशा लक्ष्मीकांत चौकेकर पूर्वाश्रमीची संगिता वसंत पेडणेकर ही पंचायत समिती वेंगुर्ला येथे विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होती. सुमारे वीस वर्षापासून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दिशा चौकेकर हीचा वेंगुर्ला येथील तीच्या रहात्या घरी शनिवार डोक्यावर धारधार हत्याराने हल्ला करुन निर्घण खून करण्यात आला आहे.
त्यानंतर नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने तीचा गळा दाबून तीला ठार मारुन तीच्या रहात्या घराच्या टेरेसवर तिचा मृतदेह नेऊन तिने नायलॉन दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला. त्यानंतर पोलीसांना हाताशी धरुन परिस्थितीजन्य पुरावेच नष्ट करण्याचे उघड प्रकार करण्यात आलेले आहेत, असा आरोप वसंत पेडणेकर यांनी केला आहे.
तर पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे त्यांनी तक्रार केली असून आयोगाकडून दाद मिळावी अशी मागणी वसंत पेडणेकर यांनी केली आहे.