कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतीच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाचा समजल्या जाणार्‍या यु टाईप रस्त्याचे ८० फुटी रुंदीकरण करण्यात येणार आहे . या रुंदीकरणाबाबत नागरीकां कडून महापालिकेने हरकती आणि सुचना लेखी स्वरूपात मागविल्या आहेत . परंतु या प्रक्रियेची मुदत संपण्यापूर्वीच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या सिमा निश्चित करण्यासाठीचे कामाला महापालिकेने गती दिली आहे . महापालिकेच्या या कृती विषयी नागरीकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे .प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या काटेमानिवली चौक ते सिध्दार्थ नगर ते तिसगांव या रस्त्याच्या ८० फुट इतके रुंदीकरण प्रस्तावित आहे . महापालिकेच्या मुळ विकास आराखड्याच्या डी.पी. प्लॅन मध्ये हा प्रस्तावित रस्ता काही ठिकाणी ४० फुट तर काही ठिकाणी ६० फुट अशी मंजुरी आहे . परंतु कल्याण पूर्वेतील वाढत्या लोकसंख्येचा आणि विकासाचा विचार करता या डी . पी . प्लॅन मध्ये फेरकार करून या रस्त्याचे सरसकट ८० फुट इतके रुंदीकरण करण्यात येणार आहे . या बदला नंतर या रस्त्याच्या मार्गात असलेली निवासी घरे आणि व्यापारी संकुलांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

या बदलाबाबत महापालिकेच्या नगर रचना विभागाने नागरीकांकडून लेखी स्वरूपात हरकती आणि सुचना मागविल्या आहेत. या प्रक्रियेची अखेरची तारीख १८ मे २०२३ ही आहे. परंतु ही मुदत संपुष्ठात येण्या पूर्वीच महापालिकेने प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असललेल्या सिमांकन निश्चितीला ४ दिवसांपूर्वीच प्रारंभही केला असून या सिमांकनाचे काम शुक्रवार सायंकाळपर्यंत तिसगांव नाका ते म्हसोबा चौक या दरम्यान पुर्णही करण्यात आले आहे .प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीकरणासाठी एका संस्थेने पुढाकार घेउन जो पर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत रस्ता रुंदीकरणाला विरोध करण्याची तयारी सुरु केली आहे. तर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणी साठी विविध संस्था संघटनांच्या पुढाकाराने कल्याण पूर्व विकास समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणाच्या समर्थनार्थ पूर्वेत ठिकठिकाणी सह्यांची मोहीम राबवली जात आहे.

लवकरच या सर्व सह्या पालिका आयुक्तांकडे देण्यात येवून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या यु टाईप रस्त्याच्या कामाला पालिका स्थरावरून सुरुवात होणार असल्याचे चित्र दिसत असतांनाच या रस्त्याच्या कामासाठी विरोधक आणि समर्थक एकमेकांसमोर येत असल्याने याच कारणामुळे कल्याण पूर्वेतील राजकारण मात्र ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे .