Home स्टोरी ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’! गुरुमाऊली आप्पा मोरे

‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’! गुरुमाऊली आप्पा मोरे

112

नाशिक (प्रतिनिधी): आत्मा तोच परमात्मा किंवा पिंडी तेच ब्रह्मांडी असे आपण म्हणतो याचा अर्थ असा की, परमेश्वर हा अन्यत्र कुठेही नसून तो साक्षात आपल्या ह्रदयात वसलेला आहे. त्यामुळे सेवेकर्‍यांनी इतरत्र कुठेही फिरत बसण्याऐवजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ याप्रमाणे सेवाकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले.दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवार दि. २० जुलै रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. यावेळी महाराष्ट्रासह दिल्लीतून मोठ्या संख्येने सेवेकरी आले होते. गुरुमाऊलींनी पुरुषोत्तम मासासह विविध विषयांवर अत्यंत प्रासादिक मार्गदर्शन केले.

गुरुमाऊली म्हणाले की, पुरुषोत्तम आणि श्रावण हे दोंन्ही मास अधिकाधिक सेवेसाठी आहेत. पुरुषोत्तम अर्थात अधिक मासात भागवत ग्रंथाचे पारायण करणे ही सर्वोच्च सेवा मानली जाते. हे महत्त्व ओळखून शनिवार दि. २२ जुलै रोजी होणार्‍या मासिक महासत्संगाच्या दिवशी सकाळी ८ वाजता पुरुषोत्तम पूजनाची अतिउच्च सेवा होणार आहे. त्याशिवाय पुरुषोत्तम याग आणि संक्षिप्त भागवत ग्रंथाचे सामुदायिक पारायण होणार आहे. भगवान विष्णुला अधिक मासात त्यांना प्रिय असलेले तेहेतीस अनारशांचे दान देण्याची प्रथा आहे. तेव्हा सेवेकर्‍यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनाच भगवान श्रीविष्णु मानून अपूप दान करावे आणि विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी. या उपक्रमानंतर दि. २३ ते २९ जुलै या काळात गुरुपीठात याज्ञिकी प्रशिक्षण होणार असून दि. २८ जुलै ते ५ ऑगस्ट या काळात भागवत नाम सप्ताह आणि निरुपण ही महत्त्वपूर्ण सेवा मर्यादित स्वरुपात संपन्न होणार आहे. अशा बहुविध सेवा असल्याने सेवेकर्‍यांनी आवडेल त्या उपक्रमात सहभागी व्हावे असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले.श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने गेल्या सत्तर वषार्र्ंपासून आदर्श व सदाचारी पिढी घडविण्यासाठी, बालकांवर सुसंस्कार होण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, युवकांना योग्य दिशा देण्यासाठी, मानवी समस्या निर्मूलनासाठी, समाज अन् राष्ट्र संपन्न व सशक्त होण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी, उपवर मुला-मुलींच्या विवाहाची समस्या सुटण्यासाठी, शेतकरी सुखी होण्यासाठी, समाजाला विषमुक्त अन्नधान्य मिळण्यासाठी, सर्वांचे आरोग्य निरामय राहण्यासाठी, शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी, विनामूल्य सर्वतोपरी प्रयत्न केले जाताहेत अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली.

सेवामार्गाच्या वतीने आजवर हजारो बेरोजगारांना रोजगार मिळाला असून येत्या २२ जुलै रोजी गुरुपीठात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच एखाद्या कामासाठी प्रशासनावर अवलंबून राहण्याऐवजी सेवेकर्‍यांनी गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची भूमिका स्वीकारून जनहिताचे कार्य करावे अशी आज्ञा गुरुमाऊलींनी केली. सत्संगानंतर सेवेकर्‍यांनी पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला.