Home स्टोरी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी!

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी!

185

५ ऑगस्ट वार्ता: ज्ञानवापी मशीद भगवान शंकराचं मंदिर पाडून त्याच जागेवर बांधली असल्याचा दावा करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात असून याप्रकरणी मशीद आणि आसपासच्या परिसराचं पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे अंजुमन इस्लामिया मस्जिद कमिटीने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी शुक्रवार दि.४ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवल्यामुळे आता ज्ञानवापीचं सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. एएसआयने अयोध्या प्रकरणातही सर्वेक्षण केलं होतं. एएसआयच्या ४० सदस्यीय पथकाने ज्ञानवापीचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. या पथकाने शुक्रवारी ज्ञानवापी मशीद संकुलाचं मॅपिंग केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय आणि बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कलाम आर. खान याने याबद्दल मत सोशल मीडियावरून व्यक्त केलं आहे. कमाल खानने म्हटलं आहे की ज्ञानवापी मशिदीचं मंदिरात रुपांतर करायचंच, असा निर्धार जर सरकारने केला असेल तर सरकारला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे माझ्या मते आता मुस्लीम समाजाने स्वतःहून मशीद सरकारच्या ताब्यात द्यावी.

काय आहे नेमकं ज्ञानवापी मशिदीचं प्रकरण?….ज्ञानवापी मशीद परिसरात पूजाअर्चा करू द्या, अशी विनंती वाराणीसीतील काही साधूंनी १९९१ मध्ये न्यायालयाकडे केली होती. हिंदू मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून ही मशीद बांधण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. अलिकडेच पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगारगौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने या संकुलाच्या तळमजल्यांचं सर्वेक्षण आणि चित्रीकरणासाठी समिती नेमली आहे. या सर्वेक्षणावर मशीद व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला. तिथे सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला आहे, तर तो वजुखान्याचा भाग असल्याचा मुस्लीम याचिकाकर्त्यांचा दावा आहे. आता याप्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे.