Home स्टोरी जय जय रघुवीर समर्थ! आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!श्लोक क्रमांक ७ आणि...

जय जय रघुवीर समर्थ! आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!श्लोक क्रमांक ७ आणि अर्थ

115

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे,

मना बोलणे नीच सोशीत जावे,

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे,

मना सर्व लोकांसि रे नीववावे ||७||

अर्थ: हे मना, तुझ्याकडे नेहमी धाडस, धैर्य असायला हवे आणि कोणी दूषणे दिली असल्यास ती सोसायची ताकत असायला हवी. आपण नेहमी नम्र भाषेत बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे.या श्लोकात समर्थ समजावताहेत की हे मानवा, श्री रामाचा आनंत मार्ग अनुसरायचा असेल तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणे आवश्यक आहे. संसारात वेगवेगळ्या प्रसंगाना धाडसाने तोंड देतो तसेच धाडस, म्हणजेच धैर्य हे परमार्थाच्या मार्गाने जाण्यामध्येदेखील काही अडचणी आल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी मनामध्ये असले पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्ग क्रमणे तुला शक्य होणार नाही. या परमार्थसाधनेच्या मार्गात कोणी चेष्टा केली, अयोग्य शब्दांनी तुझा पाणउतारा केला तरी तू ते सहन करून त्याच्याकडे डोळेझाक केली पाहिजे, सोशिकपणा दाखवला पाहिजे आणि स्वत: अतिशय नम्रपणाचे वर्तन ठेवले पाहिजे. धैर्यपूर्ण, सहनशील आणि नम्र वागण्याने तू समस्त लोकांना आपलेसे करून घ्यायला पाहिजे.