भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे. याद्वारे लँडर विक्रम चंद्राच्या आणखी जवळ पोचले आहे. लँडर विक्रम आता ११३ x १५७ किमीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच आता चंद्रापासून त्याचे सर्वांत अल्प अंतर ११३ किमी आहे आणि सर्वोच्च अंतर १५७ किमी आहे. डिबूस्टींगचा उद्देश लँडर विक्रमला चंद्राच्या कक्षेच्या अगदी जवळ पोचवणे हा आहे. याद्वारे चंद्राच्या ३० किलोमीटर अंतरापर्यंत लँडरला जवळ आणण्यात येणार आहे. यानंतर लँडर विक्रमला चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता केली जाणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) ट्वीट करून सांगितले की, लँडर चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्याने स्वतःहून यशस्वीपणे डिबूस्टींग प्रक्रिया केली आहे. पुढील डीबूस्टिंग प्रक्रिया २० ऑगस्टला दुपारी २ वाजता प्रस्तावित आहे. यानंतर चंद्रापासून लँडर विक्रमचे किमान अंतर ३० किमी आणि कमाल अंतर १०० किमी असेल.