गोवा: गोवा येथील राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ शिवशंभू विचार दर्शन मंच आणि गोवा राज्य पुरातत्त्व व पुराभिलेख खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १९ नोव्हेंबर रोजी गोवा पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्या संकुल येथे एकदिवशीय शिवशंभू विचार दर्शन कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षपूर्तीबद्दल आणि शिवरायांनी बार्देश स्वारी केली त्या १९ नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे दुरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानाबरोबर गोमंतक भुमीवरही झाले. छत्रपतीं शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतक भुमीवर पोर्तुगीजांशी संघर्ष करुन येथील भारतीय धर्म संस्कृती अबाधित राखली. गोव्यात छत्रपती शिवरायांना दैवत मानले जाते असतानाही छत्रपतींच्या कार्याविषयी अनेक जण शंका उपस्थित करतात. या शंकांचे निरसन व्हावे, छत्रपतींच्या कार्याविषयी इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी, यांना ओळख व्हावी यासाठीच या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा गोमंतकीय भूमीवर पडलेला सामाजिक व राजकीय प्रभाव जाणून घेण्यासाठी शिवप्रेमी अभ्यासक व विद्यार्थी यांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ शिवशंभू विचार दर्शन मंच यांनी केले आहे.