सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील गुळदुवे गावचा वार्षिक श्री देव वीरेश्वर जत्रोत्सव सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी सकाळपासूनच सर्व पारंपरिक धार्मिक कार्यक्रम विधीवत पार पडतील. सकाळी देवतांचे पूजन व नैवेद्य होईल. दुपारपासून देवदर्शनासह नारळ- केळी ठेवून ओटी भरण्याच्या सोहळ्यास सुरुवात होईल. रात्री १२ वाजता देवतांची पालखी मंदिर प्रदक्षिणेस निघेल. यावेळी उपस्थितांना फटाक्यांची आतषबाजी पाहता येईल. त्यानंतर रात्री आरोलकर दशावतार मंडळींचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी आणि गुळदुवे ग्रामस्थांनी केले आहे.