Home स्टोरी गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या चरणी कोट्यवधी सेवेकरी नतमस्तक!

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या चरणी कोट्यवधी सेवेकरी नतमस्तक!

129

२ जुलै वार्ता: युगप्रवर्तक परमपूज्य गुरुमाऊलीअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख, कोट्यवधी निस्सीम सेवेकर्‍यांचे श्रद्धास्थान, विश्वगुरुकडे वाटचाल करणारे संत, अध्यात्माच्या माध्यमातून राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी सक्रिय चळवळ राबविणारे शांतीदूत, अशा अनेक विशेषणांनी ज्यांचा यथोचित गौरव होतो ते परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त कोट्यवधी सेवेकरी नतमस्तक होत आहेत.गेल्या चार दशकाहून अधिक काळ सेवेकरी परिवाराला सोबत घेऊन गुरुमाऊली अखिल जीवसृष्टीच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहेत. मानव समाज सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावा,याच बरोबर राष्ट्राची प्रगत व्हावी, राष्ट्रहित जोपासले जावे आणि अखिल विश्वात शांती प्रस्तापित व्हावी या एकमेव उद्देशाने गुरुमाऊली निष्काम कर्मयोगीप्रमाणे कार्यरत आहेत. आपल्या असंख्य सेवेकर्‍यांनाही संसारात राहून निष्काम कर्मयोगीप्रमाणे सेवाकार्य करण्याचा कानमंत्र देऊन मानव हिताची ही चळवळ अधिकाधिक गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

या सेवामार्गाची सुरुवात सात दशकांपूर्वी झाली. विश्वाचे चालक, मालक, पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आज्ञेने परमपूज्य सद्गुरु पिठले महाराज यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये दरबाराची स्थापना केली आणि त्याच्या नंतर त्यांचे अंतरंग शिष्य परमपूज्य सद्गुरु श्री. मोरेदादा यांनी नाशिकचा दरबार दिंडोरीला आणून दिंडोरी प्रणीत सेवामार्गाची मुहूर्तमेढ रचली. परमपूज्य मोरेदादांनी अक्षरश: झोकून देऊन स्वामीकार्य केले.

सेवामार्गाची आचारसंहिता आखली, नामसप्ताह सुरु केले, प्रश्नोत्तराची सेवा प्रारंभ केली, महिलांना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचा अधिकार मिळवून दिला, विवाह संस्कार आणि मूल्यसंस्काराला प्राधान्य दिले, सेवेकर्‍यांसाठी आवश्यक ग्रंथसंपदेची निर्मिती केली आणि मानव सेवा व स्वामी कार्याचा प्रचार प्रसार आजन्म केला. सेवामार्गाची सूत्रे स्वीकारल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींनी गेल्या चार दशकाहून अधिक काळ अष्टौप्रहर स्वामीकार्य इतक्या प्रचंड वेगाने सुरु केले की आज महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कनार्टक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू , उत्तरप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, आदी राज्यांसह नेपाळ, अमेरिका, दुबई, कॅनडा, युरोप, इंग्लड, ऑस्ट्रेलिया. उमान अशा विविध देशांमध्ये सेवामार्गाचा झपाट्याने विस्तार झाला आहे.

सेवामार्गाचा विस्तार करतांना गुरुमाऊलींनी ‘अध्यात्मातून राष्ट्रविकास’ हा मूलमंत्र सेवेकर्‍यांना दिला आहे. स्वत:साठी जगू नका, दुसर्‍यांसाठी जगा हा विचार त्यांनी सेवेकर्‍यांच्या अंत:करणात रुजविला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या लोकोत्तर महापुरुषांचे सेवाभावी व्रत परमपूज्य गुरुमाऊली ‘ग्राम अभियानाच्या’ माध्यमातून आज सक्षमपणे राबवित आहेत. ग्राम अभियानाच्या माध्यमातून असंख्य सेवेकर्‍यांना त्यांनी गावागावात जाऊन अंधश्रद्धा दूर करण्याची, स्वच्छता अभियान राबविण्याची, अज्ञानी जनाला ज्ञानी करण्याची जणू दीक्षा दिली आहे. गावे स्वावलंबी, संपन्न झाली की राष्ट्र बलवान होईल ही गुरुमाऊलींची विचारधारा आहे. त्यामुळे अध्यात्म केवळ वीस टक्के आणि ऐंशी टक्के समाजकारण हे सूत्र त्यांनी दिले आहे. या सूत्रानुसार ग्राम अभियानाचे अठरा विभाग कार्य करीत आहेत. ग्राम अभियानातून मूल्यसंस्काराचे महत्त्व प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचे कार्य गुरुजन प्रतिनिधींच्या माध्यमातून सुरु आहे. घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झाले तर भावी पिढी संस्कारक्षम, कर्तृत्त्ववान, निर्व्यसनी आणि सदाचारी होईल व त्यातून देश अधिक प्रगतीपथावर जाईल ही नवी दृष्टी गुरुमाऊलींनी समाजाला दिली आहे. त्याकरिता आज सेवामार्गाचे हजारो बालसंस्कार वर्ग देश-विदेशात सुरु आहेत. विवाह मंडळांच्या माध्यमातून विना हुंडा अल्प खर्चात विवाह करण्याचा सेवामार्गाने पुरस्कार केला असून शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह विनामूल्य केले जात आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि विषमुक्त शेतीसाठी गुरुमाऊलींनी आजवर हजाराहून अधिक शेतकरी मेळावे घेऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आहे. दु:खी-कष्टी, पीडित अशा कौटुंबिक समस्याग्रस्ताला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विनामूल्य समुपदेश केले जाते. गेल्या सात दशकांपासून हे कार्य अविरत सुरु आहे. गर्भसंस्कार, शिशूसंस्कार आणि युवा प्रबोधनाच्या माध्यमातून भावी पिढी सशक्त व आदर्श नागरिक होण्यासाठी बहुविध उपक्रम हाती घेतले जातात, भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता विभागात महिलांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. निरामय आरोग्यासाठी आरोग्य व आयुर्वेद विभाग कार्य करीत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकर्‍यांना महावृक्षारोपण अभियान आणि संवर्धन व सीडबॉलचा उपक्रम दिला आहे. त्यानुसार 2025 सालापर्यंत सेवेकरी सव्वाकोटी वृक्षांची लागवड आणि संवर्धन करणार आहोत. 2022 सालापासून या अभियानाला सुरुवात झाली. पर्यावरण प्रकृती व दुर्ग संवर्धन अभियान, स्वयंरोजगार विभाग, वास्तूशास्त्र, प्रशिक्षण, कायदेविषयक सल्लागार, याज्ञिकी, देश-विदेश अभियान, श्री स्वामी समर्थ अंक व प्रचार प्रसार आणि प्रशासकीय असे अठरा विभाग परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकर्‍यांसाठी आणले आहेत. आवडेल त्या विभागात कार्य करा, असे गुरुमाऊली नेहमी सांगतात.गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतांना वैयक्तीक काही न मागता राष्ट्रहित आणि विश्वशांतीसाठी स्वामींकडे प्रार्थना करा,नेहमी दुसर्‍याचे चांगले चिंतले की आपलेही चांगले होते हा सकारात्मक दृष्टिकोन माऊलींनी सेवेकर्‍यांना दिला आहे. मीपणा, गर्व अहंकार, कर्तेपणाची भावना आणि षडरिपू या दुर्गुणांपासून नेहमी लांब रहा कारण अहंकार केलेली सेवा नष्ट करतो तेव्हा अहंकाराला नष्ट केल्याशिवाय सेवेकरी होता येणार नाही, जे सेवेकरी अत्यंत नम्र भावाने स्वामींची सेवा करतात, ग्रामअभियान राववितात, दुसर्‍यांच्या कल्याणासाठी झटतात असे सेवेकरी स्वामी महाराजांना विशेष प्रिय आहेत असे गुरुमाऊली आवर्जून सांगतात. त्यांचे अमृततुल्य हितगुज म्हणजे साक्षात सरस्वतीची दिव्य वाणीच! हजारो मातांचे वात्सल्य प्रेम गुरुमाऊलींच्या नेत्रांतून सेवेकर्‍यांवर पाझरत असते, त्यांच्या ह्रदयात करुणेचा अथांग महासागर हेलावत असतो, त्यांच्या शब्दाशब्दात राष्ट्रभक्तीचा प्रत्यय येतो, अखिल जीवसृष्टीच्या कल्याणासाठी घटणारे ते थोर माहात्मे आहेत. म्हणून सेवेकरी त्यांना ‘श्री स्वामी समर्थ स्वरुप’ मानतात.

श्री स्वामी समर्थ स्वरुप परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! श्री स्वामी समर्थ !!श्री गुरुपीठ, प्रकाशन विभाग