Home स्टोरी गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी 3 महिन्यात पूर्ण करावी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी 3 महिन्यात पूर्ण करावी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

84

गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी कार्यवाहीला गती!

मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, गिरणी कामगारांना त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यात दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकेची चावी वाटप करण्यात आली आहे. आता पर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी म्हाडा कडे केले आहेत. त्याची छाननी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.

 

कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोन पनवेल येथील घरांची सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मुंबईत टेक्स्टाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे अशा सुचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.