Home स्टोरी गव्या रेड्यांमुळे कोकणी बळीराजा हैराण..!

गव्या रेड्यांमुळे कोकणी बळीराजा हैराण..!

219

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव, सोनुर्लीसह मडुरा पट्ट्यातील आंबा व काजूच्या बागायतीत गव्या रेड्यांच्या कळपांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हाता तोंडाशी आलेली आंबा व काजूच्या झाडावरील सहा फूट उंची पर्यंतची फळे गव्या रेड्यांचे कळप खाऊन फक्त करीत असल्यामुळे सध्या बागायतदारांसह शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. त्यामुळे संतप्त बागायतदार व शेतकऱ्यांनी गव्या रेड्यांचा बंदोबस्त करा आणि ते जमत नसेल तर आमच्या पोटापाण्याची सोय करा असा इशारा वन खात्याला दिला आहे.

सह्याद्री पट्ट्यात परिसरात गव्या रेड्यांच्या कळपांचा उपद्रव सुरूच असून सध्या त्यांनी हातातोंडाशी आलेल्या आंबा व काजूच्या झाडावरील सहा फूट उंची पर्यंतच्या फळाना लक्ष केले आहे. फळे खाऊन फस्त करीत असतानाच आंबा व काजूच्या फांद्या मोडून कलमांची नासधुस करीत आहेत. बागायतदार व शेतकऱ्यांनी याबाबत वन खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधले परंतु या उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.

सह्याद्री पट्ट्यात गव्या रेड्यांच्या कळपांच्या उपद्रवाचे हे चक्र तिन्ही ऋतूमध्ये सुरूच आहे. भात बियाणे पेरल्यानंतर सुरुवातीला गव्या रेड्यांचे कळप तरव्याला लक्ष करतात. त्यानंतर भात लावणी केल्यानंतर भातकापणीपर्यंत भात शेतीमध्ये त्यांचा उच्छाद सुरू असतो. त्यानंतर वायगणी भातशेती व उन्हाळी भाजीपाला शेतीतही गव्या रेड्यांच्या कळपांचा उपद्रव सुरूच असतो. सध्या गव्या रेड्यांच्या कळपांनी आंबा व काजू फळांना लक्ष केल्यामुळे बागायतदार व शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याच्या पीक काढणीच्या सुरुवातीच्या हंगामालाच फटका बसला आहे. त्यामुळे सध्या या गव्या रेड्यांच्या कळपांचे करायचे तरी काय? असा प्रश्न बागायतदार व शेतकऱ्यांसमोर आहे.

याबाबत सोनुर्ली येथील प्रगतशील बागायतदार विलास नाईक म्हणतात, सह्याद्री पट्ट्यातील गव्या रेड्यांच्या कळपांच्या उच्छादामुळे सध्या बागायतदार व शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. या गव्या रेड्यांच्या कळपांना आंबा व काजूच्या बागायतीपासून परावृत्त करण्यासाठी बागायतदार व शेतकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या परंतु या उपायोजनांना ते भिक घालत नाहीत. तसेच गव्या रेड्यांच्या कळपांच्या दहशतीमुळे कामगारही मिळत नाहीत. दिवस रात्र काबाडकष्ट तसेच झाडासह फळांचे रक्षण केल्यानंतर आंब्याला सुरुवातीचा चांगला दर मिळण्याच्या हंगामालाच गव्या रेड्यांच्या कळप आंबा व काजूचे पीक खाऊन फस्त करीत असल्यामुळे बागायतदारांसह शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

गव्या रेड्यांच्या कळपांनी उध्वस्त केलेली बाग

बागायतदारांसह शेतकऱ्यांनी याबाबत वन खात्याचे लक्ष वेधले परंतु या उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांच्या बंदोबस्ताबाबत ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे बागायतदार व शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून येत्या दोन दिवसात या उपद्रवी गव्या रेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त न केल्यास सावंतवाडी विभागीय वन कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व बागायतदारांच्यावतीने सोनुर्ली येथील विलास नाईक, श्रीहरी नाईक आदीनी दिला आहे.