Home स्टोरी कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा कोल्हापुरात गौरव!

कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा कोल्हापुरात गौरव!

161

मसुरे प्रतिनिधी: वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, विभागीय वनाधिकारी सागर गवते, दक्षता वनरुत्त कोल्हापूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवसूचे वनपाल सदानंद परब, सावंतवाडीचे लेखापाल मृणाल कुलकर्णी, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, आंबोली वनमजूर ज्ञानेश्वर गावडे यांना गौरवण्यात आले आहे.

कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत पां. शिंदे यांनी या पदाचा कार्यभार १ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतला. या परिक्षेत्रा अंतर्गत ६ वन परिमंडळे व १७ नियतक्षेत्रे यांचा समावेश आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी नियतक्षेत्र नेरुर त. हवेली मधील मौजे गोवेरी, ता. कुडाळ येथील काजू बागेतील सिंचन टाकीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या दुर्मिळ काळ्या मादी पिल्लाची (ब्लॅक पँथर) सुखरुपपणे सुटका करुन तिच्या आईसोबत (मादी बिबट) तिची पुर्नभेट यशस्वीपणे घडवून आणली. २५ नोव्हेंबर, २०२२ रोजी कर्नाटक विभागाकडील वनगुन्ह्यात सहभागी फरार आरोपी श्री. कमलाकर नाईक, रा. शिराली, ता. भटकळ, जि. उत्तर कर्नाटक यास वनविभाग होनावर, कर्नाटक राज्य पथका समवेत संयुक्त कारवाईमध्ये मालवण येथून ताब्यात घेऊन कर्नाटक वनविभागाकडे सोपविले. सदर कामगिरीसाठी वनविभाग होनावर, कर्नाटक राज्य यांचेकडून गौरविण्यात आले. मालवण तालुक्यातील गावामध्ये संघटितपणे १२ रानडुक्करांची शिकार करणाऱ्या ३३ आरोपींवर कारवाई केली.तसेच वेंगुर्ला, मालवण व कुडाळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ताब्यातील सुमारे १९१.१७५४ हे मध्ये असणाऱ्या कांदळवन क्षेत्राचे भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २० नुसार अंतिमतः करणेबाबतचे प्रस्ताव विभागीय कार्यालयास सादर केले. त्यानुसार दि.११ जानेवारी २०२१ रोजी मालवण तालुक्यातील १२८.५८४७ हे, वेंगुर्ला तालुक्यातील ६१.९१७० हे., कुडाळ ०.६७३७ असे एकूण १९१.१७५४ इतके क्षेत्र कलम २० नुसार अधिसुचित झालेले आहे.कासव संवर्धन (Olive Ridley Sea Tartle) मोहीम प्रभावी राबविताना सन २०१९-२० ते २०२१-२२अखेर पर्यंत सुमारे ५९००० कासवांची पिल्लांचे वनपरिक्षेत्रातील विविध समुद्र किनारी प्रभावी संरक्षण व संवर्धन करुन त्यांना समुद्रात त्यांचे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. मार्च २०२३ मध्ये मौजे वांयगणी, ता.वेंगुर्ला येथे “कासव महोत्सव वायंगणी २०२३ यशस्वीरित्या आयोजन करुन कासव संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती केली. सदर महोत्सवामध्ये देश विदेशातून पर्यटक, निसर्ग प्रेमी व वन्यजीव प्रेमी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सदर महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण रेंज, मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर, पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग आदि मान्यवर यांचेकडून कासव संरक्षण व संवर्धन कामाकरीता गौरविण्यात आले. अवैध वृक्षतोड व अवैध शिकारीवर आळा घालून वन व वन्यजीवांचे प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन केले आहे. वन परिक्षेत्र कुडाळ अखत्यारित कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राणी बिबट, रानगवे, खवले मांजर, ब्लॅक पँथर इ. वन्यप्राण्याची फासकीतून, विहिरीतून वेळोवेळी सुटका करुन त्यांना जीवदान दिले आहे. विभागातील अन्य परिक्षेत्रामध्ये देखील वन्यप्राणी रेस्क्यूकामी सहभागी झालो आहे. वन कायद्यांच्या तरतुदींचे प्रभावीपणे अंमलबजावणीकरीता विभागातील अधिनस्त कार्यक्षेत्रातील शाळा, कॉलेजेसमध्ये वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन जनजागृती त्यांनी केली आहे. अमृत शिंदे यांच्या सन्मानाबद्दल कौतुक होत आहे.