Home स्टोरी कुडाळ येथे ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

कुडाळ येथे ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

261

कीर्तन, प्रवचन, गायन आणि मंत्रजागर यांमुळे भाविक मंत्रमुग्ध…. 

कुडाळ: शहरातील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये अधिक श्रावण मासानिमित्त ४ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झालेल्या ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची ८ ऑगस्ट (अधिक श्रावण कृष्ण चतुर्थी ते अष्टमी) यादिवशी विद्वान घनपाठी वैदिक, ब्रह्मवृंद आणि भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.

या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत विद्वान घनपाठी वैदिक वेदमूर्ती योगेश बोरकर (बेतोडा, फोंडा, गोवा), वेदमूर्ती विजयेश सहकारी (सावर्डे, गोवा), वेदमूर्ती दत्तभार्गव टेंगसे (पैंगिण, गोवा), वेदमूर्ती रुद्रेश जोशी (डिचोली, गोवा), वेदमूर्ती वल्लभ मुंडले (तेंडोली, कुडाळ) आणि वेदमूर्ती नीलकंठ जोगळेकर (गोकर्ण, कर्नाटक) यांनी केलेल्या मंत्रघोषात ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेक’ करण्यात आला. या विधीचे यजमानपद श्री. मिलिंद गावकर आणि सौ. मानसी मिलिंद गावकर यांनी भूषवले होते.

या कालावधीत सायंकाळच्या सत्रात ‘मंत्रजागर’, ह.भ.प. (सौ. अवंतिका टोळे (पुणे) यांचे कीर्तन, श्री. राजाभाऊ शेंबेकर (चिपळूण) आणि सौ. राधा जोशी-आठल्ये (देवगड) यांचे अभंग आणि नाट्यगीत गायन, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन, असे कार्यक्रम झाले.

८ ऑगस्ट या दिवशी दुपारी जपाभिषेक झाल्यानंतर विष्णूसहस्रनाम, त्यानंतर वैदिकांनी दिलेला आशीर्वाद, आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

अधिक मासाच्या निमित्त श्री पुरुषोत्तमाच्या भक्तीचा सर्वांना लाभ व्हावा, यासाठी कुडाळ येथील पुरोहित श्री. विश्वास मुंडले आणि त्यांचे सहकारी ब्रह्मवृंद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अखेरीस श्री. मुंडले यांनी ‘हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही. सर्वांच्या सहकार्यामुळे नवीन प्रेरणा मिळाली’, अशा शब्दांत घनपाठी वैदिकांसह या कार्यक्रमासाठी विविध स्तरांवर सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

 ३ वर्षांतून येणार्‍या एकदा येणार्‍या या अधिक मासात भजन, कीर्तन, प्रवचन आणि मंत्रजागर यांच्या माध्यमातून पुरुषोत्तमाचे गुणगान श्रवण करण्याचे भाग्य लाभल्याने कृतकृत्य झाल्याचे समाधान उपस्थितांच्या चेहर्‍यावर या वेळी जाणवत होते.