Home स्टोरी कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खलना विरोधात खोत जुवा बेटावरील महिला आक्रमक.

कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खलना विरोधात खोत जुवा बेटावरील महिला आक्रमक.

148

चार बोटींवर कारवाई ; अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या बोटी, अनधिकृत कामगार, बेकायदेशीर उभारणी केलेल्या झोपड्यांवर कारवाईचे तहसीलदार यांचे प्रशासनास आदेश.

मालवण प्रतिनिधी: कालावल खाडीपात्रात अनधिकृत रित्या वाळु उत्खनन सुरू आहे. यावर स्थानिक महसूल यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने संतप्त बनलेल्या खोत जुवा बेट येथील महिला व ग्रामस्थ यांनी मालवण तहसील कार्यालय येथे धडक देत तहसीलदार वर्षा झालटे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व टीम घटनास्थळी पोहचले. काही बोटी खाडी पात्रात वाळू उत्खनन करत असल्याचे दिसून आले. त्यांचा पाठलाग करण्यात आला. चार बोटींवर यावेळी कारवाई करण्यात आली तर काही बोटी पळून गेल्या. कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. कारवाई होऊनही वाळू उत्खनन सुरू राहिल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडले जाईल. असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.

यावेळी खोत जुवा बेट येथील रहिवाशी महिला ग्रामस्थ यांनी अनधिकृत वाळू उत्खनन प्रश्नी समस्या, तक्रारींचा पाढा वाचला. वाळू उत्खनन कामगार यांच्या वर्तणूक बाबतही महिलांनी तक्रारी केल्या. एकूणच सर्व तक्रारी ऐकून घेत कारवाई धडक करण्याबाबत तहसीलदार यांनी ग्रामस्थांना आश्वासीत केले.अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेल्या परिसरात महसूल यंत्रणा माध्यमातून सतत गस्त व पाहणी केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांवर तसेच किनाऱ्यावर नोंदणी नसलेल्या अज्ञात स्वरूपात असलेल्या होड्यावर कारवाई केली जाईल. तसेच बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या वाळू उत्खनन कामगार तसेच त्यांनी बेकायदेशीर उभारलेल्या झोपड्या यावरही कारवाई करून त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्या बाबत महसूल पोलिस यंत्रणेला तहसीलदार वर्षा झालटे यांनी सूचना दिल्या आहेत.

छोट्या बोटीतून खाडीपात्राची पाहणी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांसोबत छोट्या बोटीतून कालावल खाडी पात्रात पाहणी केली. कुठे कुठे अनधिकृत स्वरूपात वाळू उत्खनन होते. होड्यातील वाळू कुठे उतरवली जाते. याबाबत प्रत्यक्ष पाहणीत माहिती घेतली. फोटो ; कालावल खाडी पात्रातील अनधिकृत वाळू उत्खनन प्रश्नी खोत जुवा बेट येथील महिला व ग्रामस्थ यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांसमोर आक्रमक भूमिका मांडली.