Home स्टोरी ओटवणे मांडवफातरवाडी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.

ओटवणे मांडवफातरवाडी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उत्स्फूर्त प्रतिसाद.

99

सावंतवाडी: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडविणे तसेच रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. आयुर्वेद संस्थानची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत असून आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ. मोहन जोशी यांनी केले.

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ओटवणे मांडवफातरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ मोहन जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रसाद नार्वेकर, डॉ अखिला एम, डॉ रश्मी जोशी, ओटवणे येथील मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, प्रकाश पनासे, दाजी सावंत, रामचंद्र म्हापसेकर, शंकर म्हापसेकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे कर्मचारी सुमा नाईक, पूजा झोळंबेकर, गिरीश नाईक, ओंकार पाटील, प्रमोद सावंत, सागर धुरी आदी उपस्थित होते.

शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सुरेश तावडे यांच्याहस्ते श्री गणपती आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या

शिबिरात डॉ मोहन जोशी, डॉ प्रशांत ससाणे, डॉ प्रसाद नार्वेकर, डॉ अखिला एम, डॉ रश्मी जोशी, हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवफातरवाडी प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला मुसळधार पाऊस असूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मांडवफातरवाडी परिसरातील सुमारे २०० आबालवृद्धांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.

 या शिबिराचे संकल्प सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी मांडवफातरवाडीतील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संकल्प सेवा संघाच्यावतीने डॉ मोहन जोशी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी केले.

फोटो: ओटवणे – शिबिरात बोलताना डॉ मोहन जोशी बाजूला डॉ प्रशांत ससाणे डॉ प्रसाद नार्वेकर डॉ अखिला एम डॉ रश्मी जोशी राजाराम वर्णेकर सुरेश तावडे शंकर म्हापसेकर आदी