सावंतवाडी प्रतिनिधी(मुळदे): उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे येथील ३४ एनसीसी कॅडेट्स — १६ सिनिअर डिव्हिजन (SD) व १८ सिनिअर विंग (SW) कॅडेट्स — ५८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी यांच्या वतीने आयोजित CATC-314 / प्री-टीएससी शिबिरात सहभाग नोंदवणार आहेत. हे शिबिर ३ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत क्रीडा संकुल, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिरात कॅडेट्सना शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, पथ संचलन, शस्त्र प्रशिक्षण, नकाशा वाचन, नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकास यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यातील थल सैनिक शिबिर (TSC) आणि अन्य राष्ट्रीय शिबिरांकरिता या शिबिरास अत्यंत महत्त्व आहे.

या शिबिरात सहभाग घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी केले असून, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांनी सर्व कॅडेट्सना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाने नेहमीच एनसीसीसारख्या राष्ट्रीय सेवाभावी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.







