Home स्टोरी ई स्टोअर इंडिया कंपनीच्या विरोधात मनसेची आक्रमक भूमिका

ई स्टोअर इंडिया कंपनीच्या विरोधात मनसेची आक्रमक भूमिका

384
मनसे पदाधिकारी

सिंधुदुर्ग: ई स्टोअर इंडिया (वेदिक आयुर क्युअर ) या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच लोकांची दुरावस्था झाल्याची माहिती मिळत आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीच्या विरोधात देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. देवगड पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी यांना देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ई स्टोअर इंडिया कंपनीवर कारवाई करण्यासाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे ई स्टोअर इंडिया या कंपनीमध्ये गुंतवणूक करून पैसे तीन पट होणार अशी माहिती मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांनी बँकांकडून, बचत गटांकडून आणि प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत.

गेल्या दीड वर्षापासून ई स्टोअर इंडियाचा कारभार काही योग्य पद्धतीने चालत नाही आहे. आणि नागरिकांचे घेतलेले पैसेहि परत मिळत नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच तारांबळ उडाली आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीमधून तीन पट पैसे मिळणं तर बाजूलाच राहिलं पण घातलेली मुद्दल पण मिळत नाही आहे आणि आता ज्या बँकांकडून काही लोकांनी पैसे घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये गुंतवले होते त्यांचे आता व्याजही वाढत आहे. आणि प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे कर्मचारी, बचत गटांचे अधिकारी घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी वारंवार लोकांकडे जात असल्यामुळे लोकांना आता अफाट त्रास सहन करावा लागत आहे. ई स्टोअर इंडियाचे प्रमुख फैजान खान हे गेल्या कित्येक महिन्यापासून भारतातून गायब होऊन दुबईमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीच्या पुढे नेमकं काय होणार आहे? पैसे मिळणार की नाही? याबाबत कोणतही चित्र स्पष्ट होत नाही. याबाबत आज कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सरचिटणीस गजानन राणे यांनी ई स्टोअर इंडिया कंपनीच्या लिडरशी सविस्तर चर्चा केली. ई स्टोअर इंडिया कंपनीमुळे लोकांना होत असलेल्या समस्यांची माहिती त्यांनी आज ईस्टर्न इंडियाच्या पदाधीकाऱ्यांना दिली.

ई स्टोअर इंडियाचे प्रमुख फैजान खान

ई स्टोअर इंडिया कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कंपनीचे प्रमुख फैजान खान यांना लवकरात लवकर मनसे प्रमुख संपर्क साधण्यास सांगावा असं गजानन राणे यांनी सांगितले. जर ई स्टोअर इंडियाचे प्रमुख फैजान खान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत नसतील तर ६ में रोजी ई स्टोअर इंडिया कंपनी मध्ये काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल असे त्यानी स्पष्ट केले.